Wed, Mar 27, 2019 04:18होमपेज › Mumbai-Thane-Raigad › हुक्का पार्लर चालवणाऱ्या टोळीकडून तरुणाची हत्या

हुक्का पार्लर चालवणाऱ्या टोळीकडून तरुणाची हत्या

Published On: Dec 16 2017 11:03PM | Last Updated: Dec 16 2017 11:03PM

बुकमार्क करा

डोंबिवली : वार्ताहर

हुक्का पार्लरमध्ये येणाऱ्या गाड्या घरासमोर उभ्या राहत असल्याने एका तरुणाने विरोध केल्यामुळे संतापलेल्या हुक्का पार्लर चालविणाऱ्यांनी या तरूणावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात सदर तरुणाचा मृत्यू झाला आहे. रियाज शब्बीर शेख असे या मयत तरूणाचे नाव असून या प्रकरणी टिळक नगर पोलिसांनी गुन्ह दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे. मात्र याच दरम्यान दुसरीकडे या घटनेनंतर संतापलेल्या जमावाने हुक्का पार्लर पेटवून संताप व्यक्त केल्याने या परिसरात तणावाचे वातावरण पसरले आहे.

कल्याण पूर्वेकडील श्रीकृष्ण नगर परिसरात रियाझ शब्बीर शेख राहतो. त्याच परिसरात हुक्का पार्लर असून या पार्लरमध्ये येणारे हुक्काबहाद्दर आपल्या गाड्या रियाज याच्या घरासमोर पार्क करत असतात. परिणामी घराच्या रस्त्यावर अडथळे निर्माण होत होता. रियाज शेख याने या गाड्या पार्किंग करण्यासाठी विरोध केला होता. यावरून रियाज याचे हुक्का पार्लरवाल्यांबरोबर गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. शुक्रवारी रात्री या वादाला तोंड फुटले. रियाजचे हुक्का पार्लर चालवणाऱ्याशी शाब्दीक बाचाबाची झाली. थोड्या वेळाने हाणामारीत रूपांतर झाले. परिसरातील रहिवाश्यांनी हुक्का पार्लरमध्ये घुसून तोडफोड केली. रियाजच्या तक्रारीवरून टिळकनगर पोलिसांनी हुक्का पार्लरवाल्याच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला. मात्र शनिवारी सायंकाळी याच वादातून तक्रारदार रियाजवर चॉपर व धारदार शस्त्रांनी हल्ला चढविला. या हल्ल्यात रियाज जबर जखमी झाला. परिसरातील नागरिक व नातेवाईकांनी जखमी अवस्थेत असलेल्या रियाजला उचलून मेट्रो या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र उपचारादरम्यान रियाजने दम तोडल्याचे तेथिल डॉक्टरांनी घोषीत केले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केल्यानंतर रियाजचा मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता पालिकेच्या रुख्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये पाठविला. 

रियाजच्या मृत्यूची खबर तो राहत असलेल्या परिसरात येऊन धडकताच संतापलेल्या नागरिकांनी वादग्रस्त हुक्का पार्लरला आग लावली. या आगीत पार्लरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी कोणतीही जिवीत हानी झाली नसल्याचे वृत्त आहे. या आगीचे वृत्त कळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. अग्निशामक दलाने प्रसंगाचे गांभीर्य ओळखून आग आटोक्यात आणली नसती तर परिसरातील पसरलेल्या झोपडपट्टीमुळे आगडोंब उसळून मोठ्या प्रमाणावर हानी झाली असती. या प्रकरणी टिळकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

रियाजवर चॉपरने वार करून त्याच्यावर गोळीबारही केल्याचा आरोप घरच्यांनी केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला असता तर रियाजचा जीव वाचला असता. मात्र पोलिसांच्या बेजबाबदारपणामुळे रियाजची हत्या झाल्याचा त्याच्या कुटुंबियांनी आरोप केला आहे. तथापि वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजीराव धुमाळ यांनी मात्र गोळीबार झाल्याचा इन्कार केला आहे. या घटनेनंतर आम्ही दोघांना ताब्यात घेतल्याचेही त्यांनी सांगितले.