Sun, Jul 21, 2019 00:22होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डोंबिवलीतील बेपत्ता कॅब चालकाच्या तपासात दिरंगाई; पत्‍नीचा आरोप

डोंबिवलीतील बेपत्ता कॅब चालकाच्या तपासात दिरंगाई; पत्‍नीचा आरोप

Published On: Jan 25 2018 5:13PM | Last Updated: Jan 25 2018 5:05PMडोंबिवली : वार्ताहर

ओला कंपनीची कॅब कार चालवून उदरनिर्वाह करणारा डोंबिवलीतील तरूण रहस्यमयरित्या बेपत्ता झाला आहे. त्याच्या ताब्यातील कॅब मुंबईच्या सायन परिसरात ओला थांबा येथे पोलिसांना आढळून आली. बेपत्ता झालेल्या डोंबिवलीच्या तरूणाचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाही. त्यामुळे त्याच्या पत्नीने डोंबिवलीतील टिळकनगर पोलिस ठाण्यात तशी तक्रार दिली आहे. मात्र, पोलिस आपल्याला तपासाबाबत काहीही माहिती देत नसल्याचा आरोप पत्नीने केला आहे.

डोंबिवली पूर्वेकडील सांगर्ली परिसरातील आदित्य पवार (२७) यांचे दीपा (२५) हिच्याशी ४ वर्षांपूर्वी लग्न झाले आहे. ते अनिल निवास इमारतीत गेल्या ७ महिन्यांपासून भाड्याने रहात होते. त्यांना दक्ष हा 3 वर्षांचा मुलगा आहे. आदित्य हे ११ जानेवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता ओला कंपनीची कॅब कार घेऊन विक्रोळी येथे कामावर गेले होते. दुपारी १ वाजता आदित्य यांनी पत्नी दीपा हिला फोन करून ‘मी गाडीमध्ये असून सोबत कस्टमर आहेत, मी आता पनवेलहून ठाणे येथे जाणार आहे.’ असे  सांगितले. त्यानंतर पत्नी दीपा यांनी सांयकाळी पती आदित्य यांना फोन केला असता संपर्क झाला नाही. या संदर्भात ११ तारखेला दीपा पवार यांनी पोलिस ठाण्यात जाऊन माहिती दिली. माझ्या पतीने लग्नापूर्वी कर्ज काढले होते. घेतलेल्या कर्जामुळे त्यांना मानसिक त्रास होत असल्याचे दीपा यांनी पोलिसांना सांगितले होते.

बेपत्ता पतीच्या तपासाबाबत वारंवार विचारणा करुनदेखील पोलिस माहिती देत नसल्याचा आरोप दीपा यांनी केला आहे. याबाबत तपास करताना ज्या ठिकाणी गाडी सापडली तेथील आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून माहिती मिळविण्याचा प्रयत्न करत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.