Wed, Jul 17, 2019 11:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सेनेचे ज्येष्ठ नेते मार्गदर्शक म्हणून बसणार बाजूला 

आदित्य ठाकरेंना शिवसेना नेतेपदी बढती?

Published On: Jan 22 2018 1:45AM | Last Updated: Jan 22 2018 1:45AMमुंबई : प्रतिनिधी

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर संघटनात्मक पातळीवर शिवसेनेत मोठ्या प्रमाणात बदल करण्यात येणार आहेत. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना शिवसेना नेतेपदी बढती देण्यात येणार आहेत. तर मनोहर जोशी, लीलाधर डाके, सुधीर जोशी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांकडे मार्गदर्शकपदाची जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याची चर्चा आहे. मंगळवारी होणार्‍या शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत यासंदर्भात घोषणा होण्याची शक्यता आहे. 

निवडणूक आयोगाच्या नियमानुसार दर पाच वर्षांनी पक्षांतर्गत निवडणुका घेऊन अध्यक्ष व अन्य पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या करणे बंधनकारक आहे. त्यानुसार 23 जानेवारीला होणार्‍या शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षांतर्गत निवडणुका घेण्यात येणार आहेत. यासाठी शिवसनेने अ‍ॅड. बाळकृष्ण जोशी यांची निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे यांचीच शिवसेना पक्षप्रमुख म्हणजे अध्यक्षपदावर फेरनिवड केली जाणार आहे. त्यांच्यासोबत राज्यातील युवकांचे प्रतिनिधी म्हणून आदित्य ठाकरे यांची शिवसेना नेतेपदावर नियुक्ती केली जाईल, अशी चर्चा आहे. 

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने वरळी येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमवर मंगळवारी होत असलेली शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक अत्यंत महत्त्वाची आहे. या बैठकीत संघटनात्मक पातळीवर शिवसेनेत मोठे फेरबदल करण्यात येणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुखपदानंतर शिवसेना नेतेपद अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. सद्या पक्षात 8 नेते आहेत. नेत्यांची ही संख्या वाढवून काही नवीन चेहर्‍यांना संधी दिली जाणार  आहे. 

शिवसेना नेते रामदास कदम, खा. संजय राऊत, खा. गजाननन कीर्तिकर यांच्याबरोबर केंद्रीय मंत्री अनंत गीते, लोकसभा गटनेते आनंदराव अडसूळ, खा. चंद्रकांत खैरे, राज्यमंत्री गुलाबराव पाटील, अर्जुन खोतकर, विभागप्रमुख अ‍ॅड. अनिल परब यांच्याकडे नव्याने काही जबाबदार्‍या सोपविण्यात येणार आहेत.