होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आईने दिले बाळाला आपले यकृत!

आईने दिले बाळाला आपले यकृत!

Published On: Jul 08 2018 1:44AM | Last Updated: Jul 08 2018 12:48AMमुंबई : प्रतिनिधी

मुंबई सेंट्रलच्या वोक्हार्ट रुग्णालयामध्ये पालघरहून आलेल्या काव्य राऊत या नऊ महिन्यांच्या बाळावर यकृत प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. जिवंत दात्याकडून हे अवयवदान करण्यात आले. शस्त्रक्रियेवेळी त्याचे वजन केवळ 5.6 किलो होते. पश्‍चिम भारतात ही यशस्वी यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झालेले हे पहिलेच सर्वात लहान बाळ ठरले. ही शस्त्रक्रिया 14 जून 2018 ला करण्यात आली. ही शस्त्रक्रिया तब्बल 14 तास चालली.

नऊ महिन्यांच्या काव्यला जन्मापासूनच त्रास सुरू झाला होता. त्याला यकृताचा बिलिअरी आर्टेसिया हा आजार झाला होता. या आजारामध्ये यकृतापासून आतड्यांपर्यंत पित्त वाहून नेणारी नलिकाच अस्तित्वात नसते. दोन महिन्यांचा असताना या बाळावर मुंबईतील एका रुग्णालयामध्ये एक मोठी शस्त्रक्रिया (पोर्टो-एंटरेस्टॉमी) करण्यात आली. ही शस्त्रक्रिया अयशस्वी झाली आणि त्याच्या यकृताचे कायमचे नुकसान झाले. त्याच्या यकृताला लिव्हर सिर्‍हॉसिस हा आजार झाला. त्यामुळे त्याची वाढ खुंटली. त्याचे वजन 5.6 किलोपर्यंत येऊन थांबले. त्याला कावीळ झाली आणि पोटात पाणी साचले. काव्यचे वडील विवेक आणि आई निशा हे दोघेही वयाच्या तिशीत आहेत. ते रोजंदारीवर काम करतात. त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे.

काव्यच्या यकृताच्या जागी त्याच्या आईच्या यकृताचा काही भाग प्रत्यारोपित करण्यात आला. ही शस्त्रक्रिया तब्बल 14 तास चालली आणि आता काव्यची प्रकृती स्थिर आहे. शल्यचिकित्सक डॉ. गौरव गुप्ता यांनी आईने यकृत प्रत्यारोपणासाठी पुढाकार घेतल्याने हे शक्य झाल्याचे सांगितले. काव्य सहा महिन्यांचा असल्यापासून उपचार करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्याच्या यकृताला सिर्‍हॉसिस झालेला होता. पोटावर काही उपचार करून त्याची प्रकृती स्थिर करण्यासाठी आणि त्याचे वजन वाढावे, यासाठी अथक प्रयत्न केले; पण त्याचा फायदा झाला नाही. त्यावेळी यकृत प्रत्यारोपण करणे हाच एक पर्याय शिल्लक असल्याचे पिडियाट्रिक हेपॅटोलॉजिस्ट यांनी सांगितले.

काव्यची आई निशा हिची अलीकडेच प्रसूती झाली आहे. असे असूनही तिने पुढाकार घेऊन यकृत प्रत्यारोपणाची तयारी दर्शवली. या शस्त्रक्रियेनंतर तिचीही प्रकृती स्थिर आहे.