Sun, Jul 21, 2019 17:05
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शालेय अभ्यासक्रमात योगाचा समावेश करावा : नायडू

शालेय अभ्यासक्रमात योगाचा समावेश करावा : नायडू

Published On: Jun 22 2018 2:42AM | Last Updated: Jun 21 2018 11:47PMमुंबई : विशेष प्रतिनिधी
निरोगी राष्ट्रासाठी योग आवश्यक असून, शालेय अभ्यासक्रमात सरकारने योगाचा समावेश करावा, अशी सूचना उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केली. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त वांद्रे रेक्लमेशन येथील योगा पार्कमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. उपराष्ट्रपती नायडू म्हणाले, योग ही भारताने जगाला दिलेली मौल्यवान भेट आहे. सकारात्मक विचारांना चालना देण्यासाठी योगासने आवश्यक असून, त्यासाठी योगाभ्यास गरजेचा आहे. शालेय अभ्यासक्रमात योगाचा समावेश केल्यास निरोगी राष्ट्राची निर्मिती करणे शक्य होईल. बदलत्या जीवनशैलीमुळे वाढत असलेले ताणतणाव योगामुळे दूर करणे शक्य आहे, असा दावाही त्यांनी केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युनोमध्ये जागतिक योगदिनाचा प्रस्ताव मांडला आणि त्याचे स्वागत करीत आज जगातील 175 देशांमध्ये योगदिनाचा कार्यक्रम उत्साहाने साजरा केला जातो. भारतीय प्राचिन चिकित्सा पद्धती असलेल्या योगाला पुन्हा एकदा लोकमान्यता मिळाली आहे. केंद्रीय अवजड उद्योग राज्यमंत्री बाबूल सुप्रियो यांनी मनोगत तर योग मार्गदर्शक सुनयना यांनी सूत्रसंचालन केले.  

मंत्रालयात मोठ्या उत्साहात योग दिवस साजरा करण्यात आला. यावेळी पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी योगासने करून सहभाग नोंदवला. महाराष्ट्र शासन आणि द योग इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्‍त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गेट-वे ऑफ इंडिया येथे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मुंबई शहर तसेच पतंजली योग समिती व  मुंबई ट्रस्ट यांच्या संयुक्‍त विद्यमाने योग दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.