Sun, Jul 05, 2020 05:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › योग दिवस २८८ तालुक्‍यांमध्ये होणार साजरा : तावडे (Video)

योग दिवस २८८ तालुक्‍यांमध्ये होणार साजरा : तावडे (Video)

Published On: Jun 13 2019 3:51PM | Last Updated: Jun 13 2019 3:54PM
मुंबई  : प्रतिनिधी 

गेल्या चार वर्षांपासून 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी हा दिवस राज्यातील 288 तालुक्यांमधील तालुका क्रीडा संकुलामध्ये साजरा करण्यात येणार असून, प्रत्येक तालुक्यांमध्ये किमान 5 हजार विद्यार्थी सहभागी होणार असल्याचे शालेय शिक्षण आणि क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

आज (ता.१३) सिडनॅहम महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनासंदर्भात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी तावडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, या वर्षीचा पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिन राज्यातील सर्व 36 जिल्हयातील 288 तालुक्यांमध्ये साजरा करण्यात येणार आहे. या योग दिनामध्ये प्रत्येक तालुक्यातील किमान 5 हजार विदयार्थी (शाळा/महाविदयालये/एनएसएस/एनसीसी/स्काऊट गाईड) सहभागी घेणार असल्याने जवळपास 15 लाख विद्यार्थी सहभागी होणार आहेत. 

केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालयामार्फत देण्यात आलेला योगबाबत प्रोटोकॉल यावेळी विद्यार्थी पाळणार आहेत. राज्यातील योग शिकविणाऱ्या संस्थांच्या मार्गदर्शनाखाली योग दिन साजरा होणार आहे. 21 जून रोजी साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे. याशिवाय 21 जून रोजी नांदेड येथे रामदेवबाबा यांच्यामार्फत आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये 1.50 लाख नागरिक सहभागी होणार आहेत.

ज्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे उदाहरणार्थ मुंबई, कोकण किंवा पुणे अशा ठिकाणी पाऊस पडल्यास विदयार्थ्यांना योग कुठे करता येईल याबाबतही तयारी करण्यात येणार आहे. आयुष मंत्रालयामार्फत योगासाठी सकाळी 7 ते 8 ही वेळ देण्यात आली असल्याने विदयार्थ्यांची सुरक्षितता याला सुध्दा प्राधान्य देण्यात आल्याचे तावडे यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले.