होमपेज › Mumbai-Thane-Raigad › यशवंत सिन्हांच्या आंदोलनामुळे सरकारची कोंडी

यशवंत सिन्हांच्या आंदोलनामुळे सरकारची कोंडी

Published On: Dec 06 2017 1:44AM | Last Updated: Dec 06 2017 1:44AM

बुकमार्क करा

मुुंबई : विशेष प्रतिनिधी 

नागपूर अधिवेशनाच्या तोंडावर शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर विरोधक आक्रमक झाले असताना पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी दिल्ली सोडून अकोल्यात ठिय्या दिल्याने राज्य सरकारची कोंडी झाली आहे. यशवंत सिन्हा यांच्याशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली असताना मंत्रिमंडळ बैठकीत कर्जमाफीच्या मुद्द्यावर शिवसेनेचे मंत्री पुन्हा आक्रमक झाल्याने या कोंडीत भर पडली. त्यामुळे राज्य सरकारने बोंडआळीमुळे नुकसानग्रस्त शेतकर्‍यांचे पंचनामे करण्याचा निर्णय घेतानाच तातडीने कर्जमाफीचे पैसे शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला. 

गुजरातमध्ये विधानसभेची निवडणूक आणि नागपूर अधिवेशन तोंडावर असताना महाराष्ट्रात पुन्हा एकदा शेतकरी आंदोलन पेटले आाहे. मात्र, या आंदोलनाची कमान विरोधकांऐवजी भाजपच्या नाराज नेत्यांनी हाती घेतल्यामुळे राज्यात भाजपची पुरती कोंडी झाली आहे. सिन्हा यांच्या या आंदोलनाला शत्रुघ्न सिन्हा, अरुण शौरी, खासदार नाना पटोले यांनीही पाठिंबा दिल्याने सरकारची डोकेदुखी वाढली आहे. या आंदोलनाचे पडसाद मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीतही उमटले. 

शिवसेनेच्या मंत्र्यांनी कर्जमाफीच्या अंमलबजावणीबाबत नाराजी व्यक्त करीत किती शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळाली याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागितली. किती शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळाली ते सांगा, अशी मागणी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह शिवसेना मंत्र्यांनी केली. त्यावर मुख्यमंत्र्यानी तुम्हाला ही माहिती कशाला हवी, असा सवाल केला. सरकारने कर्जमाफीची घोषणा करूनही प्रत्यक्षात शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. हे पैसे नक्की कधी जमा होणार याबाबत शेतकर्‍यांमध्ये संभ्रम आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांना गावपातळीवर जाऊन कर्जमाफी मिळालेल्या शेतकर्‍यांची माहिती मागितली आहे. ज्या पात्र शेतकर्‍यांना लाभ मिळाला नसेल त्यासाठी शिवसेना आग्रही राहणार असल्याचे शिवसेना मंत्र्यांनी सांगितले. त्यावर आढावा घेऊन माहिती दिली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. 

..तर राज्य सरकार स्वत: शेतकऱ्यांना मदत करेल : महसूलमंत्री