Wed, Jul 17, 2019 19:05होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कुस्तीपटू राहुल आवारे, ललिता बाबर शासकीय सेवेत

कुस्तीपटू राहुल आवारे, ललिता बाबर शासकीय सेवेत

Published On: Aug 04 2018 1:27AM | Last Updated: Aug 04 2018 1:27AMमुंबई : प्रतिनिधी

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध क्रीडा स्पर्धांत सहभागी होऊन महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करणार्‍या अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्रीडा विभागाला दिले. कुस्तीपटू राहुल आवारे, ललिता बाबर हिच्यासह 33 खेळाडूंना शासकीय सेवेत सामावून घेण्यात येणार आहे. 

गुणवत्तापूर्ण खेळाडूंना थेट शासकीय सेवेत सामावून घेण्यासंदर्भातील बैठक मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. शालेय शिक्षण आणि क्रीडामंत्री विनोद तावडे, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे, शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, क्रीडा संचालक सुनील केंद्रेकर यांच्यासह क्रीडा विभागाचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. 

सर्वसाधारण खेळाडूंच्या प्राप्त 98 अर्जांपैकी 23 आणि दिव्यांगांमधून प्राप्त 26 अर्जापैकी 10 अशा 33 खेळाडूंना शासनसेवेत गट अ ते गट ड प्रवर्गात सामावून घेण्यात येणार आहे. शासनसेवेत आलेल्या या 33 खेळाडूंनी आपापल्या खेळात अधिकाधिक खेळाडू तयार करण्यासाठी प्रयत्न करावे. तसेच विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करावे आणि उज्ज्वल यश संपादन करावे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दिव्यांग असूनही आयटीटीएफ एशियन पॅरा टेबल टेनिस स्पर्धेत सहभागी होणार्‍या ओम लोटलीकर यास शासकीय सेवेत सामावून घ्यावे यासाठी दै.पुढारीच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात आला होता. 

सर्वसाधारण खेळाडू : राहुल आवारे (कुस्ती), ललिता बाबर (मैदानी स्पर्धा), जयलक्ष्मी सारीकोंडा (धनुर्विद्या), भक्ती आंब्रे (पॉवरलिफ्टिंग), अंकिता मयेकर (पॉवरलिफ्टिंग), अमित निंबाळकर (पॉवरलिफ्टिंग), सारिका काळे (खो-खो), सुप्रिया गाढवे (खो- खो), विजय शिंदे (पॉवरलिफ्टिंग), मोनिका आथरे (मैदानी स्पर्धा), स्वप्नील तांगडे (तलवारबाजी), आनंद थोरात (जिम्नॅस्टिक्स), सिद्धार्थ कदम (जिम्नॅस्टिक्स), मानसी गावडे (जलतरण), नेहा साप्ते (रायफल शूटिंग),रोहित हवालदार (जलतरण), युवराज जाधव (खो- खो), बाळासाहेब पोकार्डे (खो-खो), कविता घाणेकर (खो- खो), सचिन चव्हाण (रायफल शूटिंग),संजीवनी जाधव (मैदानी स्पर्धा), देवेंद्र वाल्मिकी (हॉकी), सायली जाधव (कबड्डी)

दिव्यांग खेळाडू : सुयश जाधव (स्विमिंग), लतिका माने (पॉवरलिफ्टिंग), प्रकाश मोहारे (पॉवरलिफ्टिंग), इंदिरा गायकवाड (पॉवरलिफ्टिंग), सुकांत कदम (बॅडमिंटन), मार्क धरमाई (बॅडमिंटन), रुही शिंगाडे (बॅडमिंटन), दिनेश बालगोपाल (टेबल टेनिस), ओम लोटलीकर (टेबल टेनिस), कांचनमाला पांडे (जलतरण)