Tue, Mar 26, 2019 19:56होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वरळी बीडीडी चाळींचा पुनर्विकास टाटा प्रोजेक्टसह तीन कंपन्यांच्या समूहाकडे

वरळी बीडीडी चाळींचा पुनर्विकास टाटा प्रोजेक्टसह तीन कंपन्यांच्या समूहाकडे

Published On: Jun 24 2018 1:34AM | Last Updated: Jun 24 2018 12:28AMमुंबई : पुढारी वृत्तसेवा

वरळी येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे तब्बल 11 हजार 744 कोटी रुपयांचे काम टाटा प्रोजेक्टसह कॅपिसिट इन्फ्राप्रोजेक्ट लिमिटेड आणि चीनची सिटीक या कंपन्यांच्या समूहाला मिळाले आहे. देशातील सर्वांत मोठ्या पुनर्विकास प्रकल्पांपैकी हा एक प्रकल्प आहे. 

बीडीडी चाळींच्या या पुनर्विकासाचे क्षेत्र 26 दशलक्ष चौरस फूट इतके प्रचंड असून त्यातून 10 हजार जणांना रोजगार मिळणार आहे. पुनर्विकास कामाचे हे बांधकाम आठ वर्षे चालणार असून ते पाच टप्प्यांत पूर्ण केले जाणार असल्याचे टाटा प्रोजेक्टच्या सूत्रांनी सांगितले. 

चाळीत राहणारी 10 हजार कुटुंबे या पुनर्विकास प्रकल्पाशी संबंधित आहेत. म्हाडा ही या प्रकल्पाची इम्प्लिमेंटिंग एजन्सी असून प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या चाळींत राहणार्‍या सर्व रहिवाशांना चांगले घर आणि राहणीमान मिळेल. टाटा प्रोजेक्ट्सचे व्यवस्थापकीय संचालक विनायक देशपांडे म्हणाले, हा देशातील सर्वात मोठ्या प्रकल्पांपैकी एक आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्याचे सामाजिक परिणाम खूपच सकारात्मक असतील. बीडीडी चाळ हे ब्रिटिशकालीन बांधकाम आहे. प्रस्तावित पुनर्विकासामुळे या परिसराचा चेहरामोहराच बदलणार आहे. तत्कालीन गव्हर्नरकडून 1920 साली बीडीडी चाळी बांधण्यास सुरुवात करण्यात आली. वरळीतील 22 हेक्टर भूखंडावर हे बांधकाम करण्यात आले. प्रत्येक चाळीत 80 खोल्या असून हे काम 1925 साली पूर्ण झाले.  सध्या येथे 9700 कुटुंबे वास्तव्यास आहेत. या बांधकामाला 90 वर्षे पूर्ण झाली असून महाराष्ट्र सरकारने त्यांच्या पुनर्विकासाचा निर्णय घेतला होता.