Fri, Sep 20, 2019 05:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जागतिक वित्तीय केंद्र गुजरातच्या झोळीत

जागतिक वित्तीय केंद्र गुजरातच्या झोळीत

Published On: Dec 29 2017 1:46AM | Last Updated: Dec 29 2017 1:39AM

बुकमार्क करा
मुंबई : विशेष प्रतिनिधी  

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत दिलेल्या उत्तरामुळे मुंबईला प्रस्तावित केलेले जागतिक वित्तीय केंद्र मिळण्याच्या शक्यतेला पूर्णविराम मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इच्छेखातर महाराष्ट्राचा विश्‍वासघात केला असल्याचा आरोप काँग्रेसने गुरुवारी केला.

लोकसभेमध्ये गुजरातचे खासदार रामसिंह राठवा यांच्या प्रश्‍नाला उत्तर देताना जागतिक वित्तीय केंंद्र हे गुजरातमध्ये सुरू झाले असून त्याचे संपूर्ण कार्यान्वयन आणि पूर्ण क्षमतेने वापर होईपर्यंत दुसर्‍या जागतिक वित्तीय केंद्राचा विचार करता येणार नाही, असे प्रतिपादन अरुण जेटली यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेली दोन वर्षे महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करण्याकरिता उभारलेला फार्स त्यामुळे सपशेल उघडा पडला आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्‍ते सचिन सावंत यांनी केली.

आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र म्हणून मुंबईची ओळख अगोदरच असल्याने जगातील सर्व कंपन्यांची मुख्य कार्यालये मुंबईत आहेत. मुंबईचे देशाकरिता असलेले अनन्य साधारण महत्त्व ओळखून यूपीए सरकारने देशात होऊ घातलेले पहिले आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र मुंबईतच उभारण्याचा निर्णय घेतला.  परंतु, सरकार बदलले आणि मुंबईत होऊ घातलेला महत्त्वाचा प्रकल्प 2015 च्या सुरुवातील गुजरातच्या गिफ्ट सिटीमध्ये सुरू करण्यात आला. गेली दोन वर्षे मुंबईत दुसरे आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र स्थापन करण्यात येईल, असे स्वप्न मुख्यमंत्री सातत्याने राज्यातील जनतेला दाखवत आहेत. याकरिता माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री जयंत सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली टास्क फोर्सची स्थापना करण्याचे नाटकही सरकारकडून करण्यात आले, असा हल्ला सावंत यांनी चढविला.WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex