Sun, Apr 21, 2019 04:31होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अंधेरीतील लाकूड गोदामाला भीषण आग

अंधेरीतील लाकूड गोदामाला भीषण आग

Published On: Jan 10 2018 1:58AM | Last Updated: Jan 10 2018 1:48AM

बुकमार्क करा
जोगेश्‍वरी : वार्ताहर

मुंबईत सुरु असलेले आगीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून मंगळवारी अंधेरीत लाकडाच्या गोदामाला भीषण आग लागली. यात गोदामाचे प्रचंड नुकसान झाले असून शॉर्टसर्किटमुळे आग लागण्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

अंधेरी पश्‍चिमेत, एसव्ही रोडवर आंबोली परिसरात टिंबर मार्ट हे बांबू आणि लाकडाचे गोदाम आहे. सायंकाळी 5च्या दरम्यान या गोदामाला आग लागली. एसव्ही रोडवर मोठ्या प्रमाणात लाकडाची दुकाने असल्यामुळे ही आग पसरली होती. आग विझविताना अग्निशमन दलाच्या जवानांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या आगीमुळे पश्चिम रेल्वे मार्गावरुन स्लो मार्गावरील जोगेश्वरीकडे जाणार्‍या गाड्या काही काळ थांबवण्यात आल्या होत्या. अग्निशमन दलाचे चार बंब,  पाण्याच्या तीन टँकरसह जवानांकडून रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु होते. घटनास्थळी स्थानिकांची मोठी गर्दी जमली होती.पालिकेचे अधिकारी, कर्मचारी, माजी आमदार अशोक जाधव, नगरसेविका अल्पा जाधव यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.