Tue, Apr 07, 2020 05:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › चेन स्नॅचर म्हणतात; ‘वटपौर्णिमा रोज येउद्या’

चेन स्नॅचर म्हणतात; ‘वटपौर्णिमा रोज येउद्या’

Published On: Jun 27 2018 5:18PM | Last Updated: Jun 27 2018 5:35PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

सावित्रीने यमाच्या तावडीतून पती सत्यवानाचे प्राण वाचवले होते. या क्षणाची आठवण समस्त महिलावर्ग वडाच्या झाडाला सात फेरे घालून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात तोच सण वटपौर्णिमा म्हणून ओळखला जातो. नेमक्या याच सणाचा नेम धरून आधुनिक युगातील यमांनी सावित्रीचा गळा पोरका करण्याच्या घटनेने गालबोट लागले. चेन स्नॅचर्सनी आज राज्यभरात धुडगुस घालताना अनेक किमती दागिने हातोहात लंपास करून आव्हान निर्माण केले. वडाच्या झाडाची पूजा करायला जाणाऱ्या सावित्रीच्या गळ्यातील गंठण, मंगळसूत्र हिसकावण्यासाठी चोरट्यांनी वटपोर्णिमेचा मुहूर्त साधला. 

वटपौर्णिमा हा सुवासिनींचा दिवस. या दिवशी प्रत्येक विवाहीत स्त्री नटून,  मराठमोळा साज नेसून वडाची पूजा करते. ‘जन्मो-जन्मी हाच पती मिळावा’ ही पवित्र भावना घेऊन वडाला फेऱ्या मारते. पण, यंदाची ही पौर्णिमा चेन स्नॅचिंगच्या घटनांमुळे चर्चेत आली. पुण्यातील लष्कर, शिवाजीनगर, वाकड, चतुश्रृंगी, कोंढवा, सांगवी परिसरात चेन स्नॅचिंगचे प्रकार झाले. तर साताऱ्यातही एका महिलेचे सात तोळ्यांच्या गंठणावर चोरट्यांनी हात साफ केला. पुणे आणि साताऱ्यात एकूण १४ घटना घडल्या. 

सावित्री सत्यवानाच्या कथेत यमाने पती सत्यवानाचे प्राण नेले. सावित्रीने स्वत:च्या प्राणांची पर्वा न करता सत्यवानाचे प्राण परत आणले. पण, आजच्या युगातील सावित्रींच्या पतीचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या मंगळसूत्रावरच चोरट्यांची नजर आहे. 

वटपौर्णिमेला महिला वडाची पूजा करण्यासाठी नटूनथटून, दागिने घालून घराबाहेर पडतात. त्याचाच फायदा घेत पुण्यातील शिवाजीनगरमध्ये दोन, चतुश्रुंगीमध्ये दोन, सांगवीमध्ये चार आणि इतर ठिकाणी मिळून 11 चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्या आहेत. पुण्यात घडलेल्या घटनांमध्ये चोरट्यांनी हातात पुजेचे साहित्य आणि लहान बाळ असलेल्या महिलांना हेरुनच दागिन्यांवर डल्ला मारला. 

फक्त वटपौर्णिमाच नव्हे तर इतर दिवशीही चेन स्नॅचिंगच्या अनेक घटना घडतात. रस्त्यावर चालताना सहजरीत्या होणाऱ्या चोरीच्या या प्रकारावर चोरट्यांचा जम बसला आहे. फक्त एक पळणारी गाडी आणि हातचालाखी इतक्या कमी खर्चात लाखो रूपये किंमतीचे दागिने हिसकारण्यात चोरटे सराईत झाले आहेत.  

महिलांमध्ये नाराजी; दागिने घालायचे की नाही?

वटपौर्णिमा हा पती आणि पत्नीच्या अतुट नात्याचा दिवस असल्याने महिलांमध्ये या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी प्रत्येकीला आपली पहिली वटपौर्णिमा नक्कीच आठवत असेल. पण, महिलांच्या आनंदावर विरजण घालणाऱ्या चेन स्नॅचिंगच्या घटनांमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. अशा घटनांमुळे हक्काचा दिवस असतानाही कमी दागिने घालण्याची वेळ आल्याने महिलावर्गात नाराजी आहे. 

पावसाची सुरूवात आणि मराठी वर्षातील सणांची सुरूवात एकत्रच होते. याची सुरूवात गुढी पाडव्यापासून झाली असली तरी आता वटपौर्णिमेनंतर कर्नाटकी बेंदूर आणि इतर सण होणार आहेत. सुरूवातीलाच महिलांना चेन स्नॅचिंगच्या घटनांना समारे जावे लागल्याने आगामी सणांमध्ये दागिने घालायचे की नाही असा प्रश्न महिलांना पडला आहे.