Tue, Apr 23, 2019 19:34होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महिला न्यायाधीश, वकिलांविरुद्ध आक्षेपार्ह विधान

महिला न्यायाधीश, वकिलांविरुद्ध आक्षेपार्ह विधान

Published On: Dec 08 2017 1:40AM | Last Updated: Dec 08 2017 1:18AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

महिला न्यायाधिशासह वकिलांविरोधात फेसबुकच्या माध्यमातून आक्षेपार्ह आणि वादग्रस्त विधान करुन खळबळ उडवून देणार्‍या सामाजिक कार्यकर्ते असलेल्या केतन कमलाकर तिरोडकर (53) या माजी पत्रकाराला गुरुवारी सायबर सेल पोलिसांनी अटक केली. त्यांना येथील स्थानिक न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

केतन तिरोडकर यांनी मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी तसेच पोलीस आयुक्तांच्या विरोधातही अशाच प्रकारे आक्षेपार्ह विधान केले होते. पत्रकार म्हणून काम करताना केतन तिरोडकर यांनी अनेक वादग्रस्त वृत्त देऊन खळबळ उडवून दिली होती. त्यांनी पत्रकारिता सोडून सामजिक कार्यकर्ते म्हणून कामाला सुरुवात केली. माहिती अधिकारातून अनेक वादग्रस्त प्रकरणे बाहेर काढून त्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या. अनेकदा त्यांच्या याचिकेमुळे राज्य सरकार अडचणीत आले होते. जुलै महिन्यांत एका प्रकरणात त्यांनी थेट एका महिला न्यायाधिशांसह महिला वकिलांविरुद्ध फेसबुकवर आक्षेपार्ह विधान करणारी पोस्ट अपलोड केली होती. या पोस्टवर अनेकांनी आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्याची सायबर सेल पोलिसांकडून गंभीर दखल घेण्यात आली होती.