Sun, Apr 21, 2019 02:05होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आजीची उबदार गोधडी झाली कुटुंबाचा आधार

आजीची उबदार गोधडी झाली कुटुंबाचा आधार

Published On: Jan 08 2018 8:40AM | Last Updated: Jan 08 2018 8:40AM

बुकमार्क करा
आसनगाव : जितेंद्र भानुशाली

शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील आदिवासी महिलांनी एकत्र येत ऊर्जा स्वयंसहाय्यता महिला बचतगट स्थापन करून त्या माध्यमातून ‘एक गोधडी एका कुटुंबाचा आधार’ ही संकल्पना राबवत आदर्श निर्माण केला आहे. आजीची गोधडी ही थंडीत आपले रक्षण करून मायेची ऊबही देते. शेकडो वर्षापासून आजीच्या किंवा आईच्या जुन्या साड्यांपासून उन्हाळ्यात या गोधड्या बनवण्याची परंपरा आहे. तर लहान मुलांना जन्माला आल्यापासून या गोधडीत गुंडाळून ठेवले जाते. अशा या गोधडीला ग्रामीण भागासह मुंबई-ठाण्यातूनही प्रचंड मागणी असल्याचे या आदिवासी महिला सांगतात.

लहानांपासून ते मोठ्यांनाही आजीबाईच्या गोधडीची उब हवीहवीशी वाटते. अशाच या आजीच्या गोधडीचा व्यवसाय करून संसाराला किंवा कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी विविध डिझाइन व रंगीबेरंगी गोधड्या तयार करण्याची संकल्पना अस्तित्वात आली. शहापूर तालुक्यातील खराडे ग्रामपंच्यायत हद्दीतील आदिवासी महिलांनी ऊर्जा स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या माध्यमातून दीड वर्षापूर्वी हा उपक्रम सुरू केला. या महिला बचत गटाने गोधड्या तयार केल्या, पण बाजारपेठ नसल्याने मोठे आर्थिक संकट उभे राहिले. मात्र मुंबई माझगाव डॉक शीप बिल्डर्स लिमिटेड आणि कर्वे समाज सेवा संस्था पुणे यांचे सहकार्य आणि मदतीचा हात यामुळे सध्या हा गोधडीचा व्यवसाय आकार घेऊ लागला आहे.

ऊर्जा स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या अध्यक्षा मनीषा चवर व सचिव पद्मा रिकामे यांच्या माध्यमातून सुमारे 14 महिलांनी हस्त कौशल्याने विणलेल्या विविध डिझाइनच्या गोधड्या मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली आदी ठिकाणी प्रदर्शनाच्या माध्यमातून विक्रीस उपलब्ध होत असून, ग्राहकही मोठ्या आवडीने त्या खरेदी करत असल्याचे चवर यांनी सांगितले. शहापूरसारख्या आदिवासी दुर्गम तालुक्यातील या महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून एक गोधडी कुटुंबाला आर्थिक आधार देऊ शकते हा आदर्श ठेवला आहे. दरम्यान, गोधडी उद्योजकता आणि विक्री केंद्र शहापूर-डोळखांब रोडवरील चाग्याचापाडा या गावात उभारण्यात आले आहे. याठिकाणीही पर्यटनासाठी येणारे ठाणे-मुंबईकर गोधडी आवर्जून खरेदी करताना दिसतात.

बचतगटाच्या माध्यमातून साकारण्यात येणार्‍या या गोधड्या 600 ते 2 हजार 200 रुपयांमध्ये विविध आकारत उपलब्ध असतात. वर्षभर विविध प्रदर्शनाच्या माध्यमातून 800 ते 1000 गोधड्यांची विक्री होत असल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान, डोंबिवलीतील बाळकृष्ण मंगल कार्यालयात रविवारपासून तीन दिवस गोधडी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून, या गोधडी प्रदर्शनाला आवर्जून भेट देण्याचे आवाहन बचत गटाच्या अध्यक्षा मनीषा चवर आणि सचिव पद्मा रिकामे यांनी केले आहे.