होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महिला गोविंदांचा थरथराट!

महिला गोविंदांचा थरथराट!

Published On: Sep 04 2018 1:18AM | Last Updated: Sep 04 2018 1:14AMमुंबई : प्रतिनिधी

डीजेच्या तालावर ठेका धरत दहीहंडी फोडण्यामध्ये महिला गोविंदाही कुठेही कमी नव्हत्या. मुंबई शहर आणि उपनगरात खास महिलांसाठी अनेक ठिकाणी राजकीय, सामाजिक हंड्यांचे आयोजन करण्यात आले होते. महिलांनी जास्तीत जास्त 6 थर लावून सलामी देत या दहीहंड्या फोडल्या. महिला गोविंदाचा उत्साह वाढवण्यासाठी अनेक सेलिब्रिटींनी विविध मंडळांना हजेरी लावली होती. 

बोरिवली, मालाड, विलेपार्ले, वर्सोवा, अंधेरी, जोगेश्‍वरी, कांदिवली, गोरेगाव, गिरगाव, वरळी, दादर, या परिसरात राजकीय नेत्यांसह मंडळांच्या हंड्या महिला गोविंदांचे लक्ष वेधून घेत होत्या. जवळपास महिनाभराच्या सरावानंतर दहीहंडी फोडण्यासाठी महिला पथके आतुर झाली होती. पार्ले स्पोर्ट्स क्‍लब पार्ले या महिला गोविंदा पथकाने मुंबई व उपनगरात सहा थरांची सलामी देत हंड्या फोडल्या. अंधेरी, वर्सोवा, विलेपार्ले, बोरिवली याठिकाणी या महिला गोविंदांनी हंड्या फोडल्या. पुरुषांच्या बरोबरीने या पथकाला अंधेरीच्या मंडळाकडून पन्नास हजाराचे बक्षीस देण्यात आले. या मंडळात दीडशेच्या वर गोविंदांनी सहभाग घेतला होता. 

गर्दीमुळे अनेक ठिकाणी पोहोचता आले नाही. त्यामुळे हंड्या कमी फोडण्यास मिळाल्या. काही आयोजकांकडून महिला पथकांच्या बाबतीत दुजाभाव केला. अनेक आयोजकांकडून मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतील बोलवण्यात आलेल्या सेलिब्रिटींमुळे तासन्तास ताटकळत उभे रहावे लागले. राजकीय मंडळी व सेलिब्रिटींना आधी महत्त्व दिले जात होते. महिला यादृष्टीने आयोजकांकडून पुरेसे आयोजन केले नव्हते, असा आरोप पार्ले स्पोर्ट्स क्‍लब पार्ले या महिला गोविंदा पथकाच्या गीता झगडे यांनी आयोजकांवर केला आहे. 

गिरगावचा राजा महिला दहीहंडी पथकाने गिरगावच्या राजाचा विजय असो, बोलत देवाला नमस्कार करून सरावाच्या जागेवर बांधलेली मानाची हंडी फोडत सुरुवात केली. त्यानंतर गिरगाव येथील गोवर्धनदास, आंबेवाडी, क्षत्रिय निवास, कांतीनगर, भुलेश्‍वर, ठाकूरद्वारा, वरळी, शिवडी, दादर येथे चार थराच्या सलामी देत दहीहंडी फोडल्या. दिवसभरात सगळीकडे चांगले मानधन देऊन सावित्रीच्या लेकी असे संबोधत कौतुकाची थाप मिळवली. गिरगावचा राजा महिला दहीहंडी पथक 10 वर्षांपासून शहर व उपनगरांत ठिकठिकाणी हंड्या फोडत आहे. 

सलामी देण्याचा मान सलग दहा वर्षांपासून 22 वर्षीय वीना कदम या महिला गोविंदाला मिळत आहे. या पथकात 18 ते 30 वर्षांपर्यंतच्या व्यवसायाने डॉक्टर, इंजिनीयर, वकील तर शालेय विद्यार्थिनी अशा महिलांचा समावेश आहे. सलामी देऊन मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेतून सामाजिक संस्थेतील अनाथ मुलांना वस्तूंचे वाटप केले जाते. तसेच काही रक्कम गिरगावच्या राजा या गणपतीसाठी देणगी स्वरुपात दिली जाते. विशेषत: कामाठीपुरामधील अनेक गल्ल्यांमध्ये या पथकाकडून हंड्या फोडल्या जातात. अशी माहिती पथकाच्या प्रशिक्षिका श्रद्धा तेंडुलकर यांनी दिली. 

जोगेश्‍वरी माता गोविंदा पथक, जागृत हनुमान मंदिर जोगेश्‍वरी, रणझुंजार गोविंदा पथक जोगेश्‍वरी, स्वस्तिक गोविंदा महिला पथक गोरेगाव, गावदेवी महिला गोविंदा पथक गोरेगाव, गोरखनाथ महिला गोविंदा पथक कुर्ला या सगळ्या पथकांनी पाच थराची सलामी दिल्या. 

मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरातील मिळून जवळपास 40 महिला गोविंदा पथके आहेत. महिलांच्या पथकाने 3 ते 6 थरापर्यंत सलामी दिल्या. एका पथकात कमीत कमी 50 पासून जास्तीत जास्त 200 पर्यंत महिलांचा समावेश होता. 

आयोजकांकडून महिला गोविंदांना प्रथम प्राधान्य देण्यात आले होते. दहीहंडीच्या ठिकाणी महिला कुठेही अडकणार नाहीत याची काळजी आयोजक घेत होते. यावर्षी मागील वर्षापेक्षा बक्षिसांची रक्कम वाढविण्यात आली होती. मुंबई शहर व उपनगरात त्यामानाने आयोजक कमी झाले आहेत. ठाण्याला बक्षिसांच्या रकमा मोठ्या असल्याने हंडी फोडण्यासाठी मुंबईऐवजी प्रथम प्राधान्य ठाण्याला देण्यात येत होते.