Sun, Jul 21, 2019 05:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विरोधक आक्रमक, मुख्यमंत्री प्रतिहल्ल्याच्या तयारीत

विरोधक आक्रमक, मुख्यमंत्री प्रतिहल्ल्याच्या तयारीत

Published On: Dec 10 2017 1:20AM | Last Updated: Dec 10 2017 1:02AM

बुकमार्क करा

मुंबई : उदय तानपाठक

शेतकर्‍यांची कर्जमाफी आणि त्यात आयटीने घातलेला ऑनलाईन गोंधळ, राज्यात सुरू असलेली अनेक आंदोलने यामुळे आधीच अडचणीत सापडलेल्या फडणवीस सरकारची सत्त्वपरीक्षा सोमवारपासून नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या रूपाने सुरू होत आहे. एकत्र आलेले विरोधी पक्ष आणि सरकारमध्ये राहूनच विरोधी पक्ष म्हणून काम करणारी शिवसेना यांना तोंड द्यावे लागणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच यावेळी विरोधकांच्या रडारवर असतील. रविवारी होणार्‍या मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकून विरोधक अधिवेशनातील संघर्षाचे शिंग वाजवतील, अशी शक्यता आहे.

मंगळवारी, 12 डिसेंबरला काँग्रेस-राष्ट्रवादीची हल्लाबोल यात्रा शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनावर धडकणार असल्याने त्यानंतरच सभागृहातला संघर्ष अधिक धारदार होईल. मात्र, विरोधकांच्या मोर्चेबांधणीला तितक्याच समर्थपणे परतवून लावण्यासाठी विरोधकांची काही प्रकरणे आणि अन्य माध्यमांसह प्रतिहल्ला करण्यास देवेंद्र फडणवीस तयारीत असल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगतात.

गेल्या दोन आठवड्यापासून  सुरू असलेली राष्ट्रवादीची हल्लाबोल यात्रा नागपुरात पोहोचत आहे. 12 डिसेंबरला विधान भवनावर मोर्चा काढून या यात्रेची सांगता होणार आहे. या यात्रेला विदर्भात मिळालेला प्रतिसाद सरकारला काळजी करायला लावण्यासारखा आहे. आतापर्यंत एकमेकांच्या सावलीलाही उभे न राहणारे काँग्रेस-राष्ट्रवादी या मोर्चासाठी एकत्र येणार आहेत. शरद पवारांनी एकीकडे काँग्रेस आणि राहुल गांधी यांची स्तुती केली असताना काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांनीही पवारांच्या नेतृत्वाखाली या मोर्चात सामील होण्याची तयारी दाखवली, हे लक्षणीय आहे.

कर्जमाफीसाठी ऑनलाईनची मुदत पाळता न आल्याने सतत ती वाढवून घेण्याची वेळ सरकारवर आली आहे. आता नवीन मुदत नेमकी ऐन अधिवेशनातच संपत असल्याने शेतकर्‍यांच्या खात्यात काही पडले नाही, तर सरकारला विरोधकांच्या हल्ल्याला तोंड द्यावे लागेल. आधीच या ऑनलाईन घोळामुळे चिंतेत सापडलेल्या शेतकर्‍याला कापूस आणि सोयाबीनसह अन्य शेतमालाचे कोसळलेले भाव, कापसावर आलेली गुलाबी बोंडअळी यामुळे  हवालदिल केले आहे. विरोधकांना या परिस्थितीमुळे सरकारवर हल्ला करण्याचे आणखी एक हत्यार मिळाले आहे. विशेष पॅकेजचीदेखील मागणी होईल.