Sun, Apr 21, 2019 06:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सेवा क्षेत्राने देशाची अर्थव्यवस्था मजबूत होईल : राष्ट्रपती

सेवा क्षेत्राने देशाची अर्थव्यवस्था मजबूत होईल : राष्ट्रपती

Published On: May 16 2018 1:43AM | Last Updated: May 16 2018 1:09AMमुंबई : प्रतिनिधी

सेवा क्षेत्र हा जागतिक अर्थव्यवस्थेचा आत्मा  आहे. सेवा व तंत्रज्ञानाच्या समन्वयातुन देशाची अर्थव्यवस्था मजबूत होणार आहे. उद्योगांचा मजबूत पाया असलेल्या  व सेवाक्षेत्राच्या गतीने विस्तारत असलेल्या महाराष्ट्राची भूमिका महत्वाची  ठरली असुन महाराष्ट्र हे देशाचा ग्रोथ इंजिन ठरल्याचे गौरवोद्गार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काढले. 

गोरेगांव येथील बाँबे एक्झीबिशन सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सेवाविषयक जागतिक प्रदर्शनाचे उदघाटन राष्ट्रपतींच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. 12 सर्वोत्कृष्ठ राष्ट्रीय सेवा क्षेत्रांचा शुभारंभही राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आला. केंद्रीय वाणिज्य विभाग, महाराष्ट्र सरकार यांच्यावतीने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून ते चार दिवस चालणार आहे.

सेवाक्षेत्रात 57 टक्के परकिय गुंतवणुक

डिजीटल तंत्रज्ञानाच्या वापराने भारतात सेवाक्षेत्रात वाढ होत आहे. भारत हे जगातील तिसरे सर्वात मोठे स्टार्टअप केंद्र आहे. त्यामुळे देशात तरूण उद्योजकांची पिढी तयार होत आहे. गेल्या चार वर्षाच्या काळात परदेशी गुंतवणुकीवरील निर्बंध  अनेकविध क्षेत्रात सुलभ करण्यात आले आहेत. त्याचा परिणाम परकीय गुंतवणुक वाढण्यात झाला आहे. आर्थिक सेवा, व्यापार व व्यावसायिक सेवा,संशोधन व विकास, यासारख्या सेवा क्षेत्रात एप्रिल 2000 पासुन देशात 57 टक्के परकीय गुंतवणुक झाल्याचेही राष्ट्रपतीनी सांगितले.

सेवाक्षेत्रातुन विकासाला चालना देण्यासाठी प्रयत्न : मुख्यमंत्री

आर्थिक प्रगती व रोजगार तयार करण्यात सेवाक्षेत्राची भूमिका महत्वाची ठरल्याचे सांगुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्पादन, निर्मिती व सेवा क्षेत्रात महाराष्ट्र कायमच अव्वल स्थानावर असल्याचे सांगितले. मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीची क्षमता असणार्‍या या क्षेत्राकडे महाराष्ट्राने लक्ष केंद्रीत केले आहे. अर्थव्यवस्थेतील सेवाक्षेत्राचे योगदान ह 59 टक्के असुन ते 67 टक्क्कयांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करण्यत येत आहे. ज्या 12 सर्वोत्कृष्ठ सेवाक्षेत्रांची  यानिमित्ताने निवड करण्यात आली आहे त्या प्रत्येक घटकासाठी राज्यात पोषक वातावरण असल्याचे सांगुन मुख्यमंत्र्यांनी डिजीटल सेवांमध्ये महाराष्ट्राने मोठी झेप घेतली आहे.  त्याचाच वापर करत सेवाक्षेत्राच्या माध्यमातुन राज्याच्या विकासाला चालना देण्यात येत असल्याचे सांगितले.

सेवाक्षेत्रात भारत जागतिक केंद्र व्हावे

सेवाक्षेत्रात भारत देश जागतिक केंद्र होण्यासाठी राज्यनिहाय आराखडा तयार केल्याचे सांगुन केंद्रीय उद्योग व वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार तयार होणार असल्याचे सांगितले.वित्त, पर्यटन,पुरवठा साखळी, माध्यम व  मनोरंजन,  आरोग्य, बांधकाम व अभियांत्रिकी, कायदा, पर्यावरण , वाणिज्य, शैक्षणिक ,  माहिती तंत्रज्ञान , दूरसंचार व पायाभूत सुविधा यासारख्या 12 सर्वोत्कृष्ठ  सेवाक्षेत्रांची निवड करण्यात आली असुन त्यांना राष्ट्रीय सेवाक्षेत्राचा दर्जा दिल्याचे प्रभू यांनी सांगितले.

उदय कोटक, विवेक नायर, आर. दिनेश, सुधांशु वत्स, डॉ. नरेश त्रेहान, विनायक चटर्जी, निशांत पारेख, मसुद मल्लिक, प्रफुल्ल छाजेड, प्रद्युम्न व्यास, हरी नायर यांनी अनुक्रमे वित्त, पर्यटन, पुरवठा साखळी, माध्यम व मनोरंजन,आरोग्य, बांधकाम व अभियांत्रिकी, कायदा, पर्यावरण, वाणिज्य, शिक्षण, माहिती तंत्रज्ञान या सेवाक्षेत्रातील उपलब्ध संधींच्या संदर्भात मार्गदर्शन केले.  सीआयआयचे अध्यक्ष राकेश भारती मित्तल यांनी स्वागत केले.  केंद्रीय वाणिज्य विभागाच्या सचिव रिटा टिओटिया यांनी प्रास्तविक केले.

जगाचा सेवा पुरवठादार 

रोजगार,  उत्पादकता व नाविन्यता या क्षेत्रात सेवांचे प्राबल्य असल्याचे सांगुन राष्ट्रपती म्हणाले की, तंत्रज्ञानाच्या वाढत्या वेगामुळे  शेती, उत्पादन व सुविधा क्षेत्रासाठी सेवाक्षेत्राचे योगदान महत्वाचे ठरले आहे. यामुळे रोजगाराच्या अनेक संधी नव्याने निर्माण होणार आहेत. तरूण लोकसंख्या, तंत्रज्ञानाशी जुळउन घेणारे हुषार तंत्रज्ञ, यामुळे भारत जगात वैशिष्ठ्यपूर्ण स्थीतीत असल्याचे सांगुन राष्ट्रपतीनी जगाला सेवा पुरविण्याच्या स्थीतीत भारत आज येऊन पोहोचला आहे.

सेवाक्षेत्रामुळे भरारी

देशातील तरूण उद्योजकांचा गौरव करताना राष्ट्रपती म्हणाले की,देशात  सेवाक्षेत्राचे योगदान हे सकल मूल्याच्या 61 टक्के एवढे मोठे आहे. 2016 साली  देशाची सेवाक्षेत्रातील निर्यात ही 3.4 टक्के होती ती 2022 पर्यंत 4.2 टक्कयांवर जाईल. देशाची अर्थव्यवस्था ही वेगाने वाढत  असुन भारत हे जगातील गुंतवणुकदारांचे व उद्योजकांसाठी आकर्षणाचे केंद्र  ठरले आहे. गेल्या चार वर्षाच्या काळात सकल घरेलू उत्पन्नाचा दर हा 6.9 टक्के राहीला आहे. 2018-19 या वर्षात  हा दर 7.4 टक्के राहील असे भाकितआंतरराष्ट्रीय नाणेनिधीने केले आहे. हा दर गाठण्यासाठी सेवाक्षेत्राची भरारी हेच प्रमुख कारण ठरणार आहे.