Tue, Jul 23, 2019 06:32होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भिडे गुरुजींच्यामागे ठामपणे उभे राहणार

भिडे गुरुजींच्यामागे ठामपणे उभे राहणार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

एका तपस्वी व्यक्‍तीवर खोटे आरोप करण्यात येत आहेत. गुरुवर्य भिडेगुरुजी याविषयी काही बोलणार नाहीत. वज्रमुठीप्रमाणे एकवटून आम्ही गुरुवर्य भिडेगुरुजी यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, असा निर्धार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी आज येथे व्यक्‍त केला.

भीमा-कोरेगावमध्ये झालेल्या हिंसाचारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या भिडे यांच्या समर्थनासाठी बुधवारी मुंबईतील हिंदुत्ववादी संघटनांसह शिवप्रतिष्ठानचे शेकडो धारकरी मुंबईच्या आझाद मैदानावर सन्मान मोर्चाच्या माध्यमातून बुधवारी एकवटले. या सन्मान मोर्चात उपस्थितांना मार्गदर्शन करताना शेवडे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. परीक्षित शेवडे, विश्‍व हिंदू परिषदेचे उमेश गायकवाड, हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्‍ता डॉ. उदय धुरी, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे मुंबई कार्यवाह बळवंत दळवी, सहकार्यवाह  मंगेश केणी, नवी मुंबई जिल्हाप्रमुख भरत माळी, ठाणे जिल्हाप्रमुख अनंत करमुसे यांच्यासह बजरंग दल, सनातन संस्था, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आदी संघटनांच्या कार्यकर्त्यांसह शेकडो धारकरी या मोर्चात सहभागी झाले होते.

ज्या लोकप्रतिनिधींना जनतेने सन्मानाने निवडून दिले, त्यातील काहींनी गुरुवर्य संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी विधिमंडळाच्या सभागृहात केली. ही एकतर्फी बाजू मांडण्यासाठी जनतेने त्यांना निवडून दिले आहे का? त्याला ज्या आमदारांनी विरोध केला नाही, त्यांनी साधू-संतांची परंपरा आणि विधिमंडळाच्या परंपरेचा अवमान केला आहे, असे भरत माळी म्हणाले.

ज्यांच्या अटकेची मागणी करण्यात येत आहे, ते गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजी यांनी स्वत:हूनच कोणत्याही अन्वेषणाला सामोरे जाण्याची सिद्धता दर्शवली आहे. हा प्रश्‍न सत्याचा आहे. त्यासाठी एक हिंदू म्हणून आज आपण एकवटलो आहोत. देशाला तोडणार्‍या विघातक शक्‍तींच्या विरोधात हिंदू म्हणून एकवटणे आवश्यक आहे, असे डॉ. परीक्षित शेवडे म्हणाले.

एकीकडे संविधान मानतो असे म्हणायचे आणि गुन्हा नोंद झालेले निरपराध असतील, तर त्यांना अटक करू नये, हा न्यायालयाचा निर्णय मान्य करायचा नाही, हा कावेबाजपणा आहे. जे खोट्या तक्रारी करत आहेत, त्यांचेच शासनाने अन्वेषण करायला हवे. हिंदू युवकांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांचा आदर्श उभा करणे हा गुन्हा आहे का? हेच कार्य संभाजी भिडेगुरुजी करत आहेत. 

सरकार मात्र अल्पसंख्याकांच्या दबावाने काम करत आहे का? सनातन संस्थेवर कोणताही गुन्हा नसताना संस्थेवर बंदी घालण्याची भाषा मुख्यमंत्री करत आहेत, हा या दबावाचाच परिणाम आहे. जोपर्यंत निरपराध हिंदुत्वनिष्ठांची सुटका होत नाही, तोपर्यंत आमचा लढा चालूच राहील, असे यावेळी बोलताना हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्‍ते डॉ. उदय धुरी म्हणाले.

Tags : mumbai news, Will stand firmly behind Bhide Guruji, Dr.Satchidanand Shevde, 


  •