Sun, Aug 18, 2019 15:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मराठी भाषेचा अनादर सहन करणार नाही

मराठी भाषेचा अनादर सहन करणार नाही

Published On: Feb 27 2018 2:00AM | Last Updated: Feb 26 2018 8:55PMमुंबई : प्रतिनिधी

राज्यपालांच्या अभिभाषणाचा मराठी अनुवाद विधिमंडळाच्या सदस्यांना ऐकविण्याची वर्षानुवर्षांची परंपरा आहे. मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येलाच जर ही परंपरा कुणी खंडित करणार असेल, तर ते योग्य होणार नाही. विधिमंडळात घडलेल्या या प्रकारची चौकशी करून जे कोण दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई करा. मराठी भाषिक राज्यातच जर अशाप्रकारे मराठीचा अनादर होत असेल, तर ते सहन करणार नाही, अशा शब्दांत विरोधकांनी सरकारला ठणकावले.

विधान परिषदेच कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अभिभाषणाच्या मराठी अनुवादाचा मुद्दा उपस्थित करत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. काँग्रेस गटनेते शरद रणपिसे यांनी, हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे सांगत राज्यपालांचे भाषण सुरू झाले तरी त्याचा मराठी अनुवाद ऐकण्याची व्यवस्था का करण्यात आली नाही? यासंदर्भात चौकशी करून कारवाई करण्याचा आग्रह धरला.

सभागृहनेते महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी, घडलेला प्रकार निषेधार्ह असून याबद्दल दिलगिरी व्यक्‍त केली. सभापती रामराजे निंबाळकर यांनी, मराठी अनुवाद उपलब्ध नसल्यासंदर्भात माहिती घेण्यात आली असून, त्याबाबतच्या चौकशीचा अहवाल संध्याकाळपर्यंत येईल, असे स्पष्ट करत कामकाज पुढे सुरू केले.

अभिभाषणाचा मराठीत अनुवाद उपलब्ध नसण्याचा प्रकार महाराष्ट्राच्या निर्मितीपासून कधीच घडलेला नाही. हा विधिमंडळ सदस्यांचाच नाही, तर राज्यातल्या 12 कोटी जनतेचा  अपमान आहे. विरोधी पक्षांनी जागरूक राहून ही बाब निदर्शनास आणून दिली नसती, तर इंग्रजीतले भाषण असेच रेटून नेले असते. हा प्रकार जाणीवपूर्वक करण्यात आल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी केली. तसेच सभागृहात कुणी इंग्रजी शब्दाचा वापर केल्यास त्यावर तत्काळ हरकत घेणारे दिवाकर रावते आणि मराठीच्या मुद्द्यावर राजकारण करणारी शिवसेना या घटनेच्यावेळी गप्प का, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.