Thu, Jul 18, 2019 08:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कर्जबुडव्यांनी १ लाख कोटी रुपयांचा चुना लावला

कर्जबुडव्यांनी १ लाख कोटी रुपयांचा चुना लावला

Published On: Feb 23 2018 3:53PM | Last Updated: Feb 23 2018 3:53PMनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ्यानंतर देशातील बँकांना विलफुल डिफॉल्टरर्सनी जाणीवपूर्वक १ लाख कोटी रुपयांचा चुना लावल्याची माहिती समोर आली आहे. ज्यांच्याकडे कर्जाची परतफेड करण्याची क्षमता असते परंतू ते कर्ज फेडत नाहीत अशा लोकांना, कंपनीला विलफुल डिफॉल्टर म्हटले जाते. अशा कर्जबुडव्यांमध्ये फक्त कंपन्याच नाही तर व्यक्तींचाही समावेश आहे. 

एका इंग्रजी दैनिकाने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आलेल्या माहितीनुसार देशात ११ मोठ्या उद्योग समुहाकडे १ हजार कोटींहून जास्त कर्ज आहे. केवळ समुहाकडे असलेल्या कर्जाची रक्कम तब्बल २६ हजार कोटी रुपयांपर्यत आहे. तर वैयक्तिक कर्ज काढलेल्या लोकांमध्ये २५ लाखांहून जास्त कर्ज काढलेल्या अनेक लोकांचा समावेश आहे. त्यात जतिन मेहताच्या कंपनीने वेगवेगळ्या बँकांचे ५ हजार ५०० कोटी रुपये थकवले आहेत. असेही म्हटले जाते की, जतिन मेहता यांनी सैंट किटस आणि नेविस या देशांचे नागरिकत्व स्वीकारले आहे. विशेष म्हणजे या देशांकडून भारताकडे आरोपींचे प्रत्यार्पण होत नाही. त्यामुळे मेहता भारतात परतण्याची शक्यता धूसर आहे. विजय मल्ल्या देखील भारतात ३ हजार कोटींचा घोटाळा करुन परदेशात पळून गेला आहे. 

त्यापाठोपाठ कोलकत्त्यातील आरईआय ॲग्रो कंपनीचा मालक संदीप झुनझुनवालाने २ हजार ७३० कोटी रुपयांचे कर्ज थकवले आहे. या कंपनीने आयपीएलमधील एका संघाचे प्रायोजकत्वदेखील घेतले होते. 

महुआ मीडिया, पर्ल स्टुडिओ, सेंच्युरियन कम्युनिकेशनचा मालक असलेला प्रबोध कुमार तिवारी कर्जबुडवणाऱ्यांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्याच्या कंपन्यांनी वेगवेगळ्या बँकांमध्ये मिळून २ हजार ४१६ कोटी रुपये थकवले आहेत. याशिवाय २ हजार कोटींहून अधिक कर्ज घेतलेल्या काही कंपन्या आहेत. त्यात झूम डेव्हलपर्स, रीड ॲण्ड टेलर, एस कुमार्स नेशनवाईड आणि डेक्कन क्रॉनिकल होल्डिंग्स या कंपन्यांचा समावेश आहे.

कर्ज थकवण्याचे प्रमाण वाढले

थकीत कर्जांमध्ये गेल्या चार वर्षांत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. गेल्या एका वर्षांत थकीत कर्जाच्या रक्कमेत २७% वाढ झाली असून त्याअगोदर तीन वर्ष अनुक्रमे ३८ टक्के, ६७ टक्के आणि ३५ टक्के थकीत कर्जात वाढ झाली होती. सप्टेंबर २०१३ ते सप्टेंबर २०१७ या कालावधीत थकीत कर्जाची रक्कम २८ हजार ४१७ कोटी रुपयांवरुन १ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहचली आहे. ही वाढ २०१३ च्या तुलनेत जवळपास चौपट झाली आहे. 

सरकारी बँकाची अवस्था बिकट

फसवणूक झालेल्या बँकांमध्ये ६० टक्के सरकारी बँकांची रक्कम आहे. २५० कोटी रुपयांहून अधिक रक्कम थकवलेल्या ५० पेक्षा जास्त कंपन्यांजवळ जवळपास ४८ हजार कोटी रुपये अडकून पडले आहेत. ही रक्कम भारताच्या अर्थसंकल्पात आरोग्यासाठी करण्यात आलेल्या रक्कमेपेक्षा थोडीशी कमी आहे. सध्या फसवणूक झालेल्या बँकामधील एक चतुर्थांश भाग एसबीआय आणि त्यांच्या सहकारी बँकांचा आहे. तसेच खासगी बँकानादेखील १४ हजार कोटींचा फटका बसला आहे.

विलफुल डिफॉल्टर कसे ठरवतात?

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार ज्याच्याकडे कर्ज परतफेड करण्याची क्षमता आहे; पण कर्ज परत केले जात नाही, त्यांना विलफुल डिफॉल्टर्स म्हटले जाते. कर्ज घेण्यासाठी जे कारण सांगतात ते सोडून इतर ठिकाणी पैसे वापरल्यास बँक अशा लोकांची नावे विलफुल डिफॉल्टर्सच्या यादीत टाकते. तसेच ज्या कर्जदारांनी तारण म्हणून ठेवलेल्या संपत्तीचा व्यवहार केला असेल त्यांचेही नाव विलफुल डिफॉल्टर्सच्या यादीत टाकतात.