Tue, Mar 19, 2019 12:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पत्नीने भावाच्या मदतीने केली पतीची हत्या

पत्नीने भावाच्या मदतीने केली पतीची हत्या

Published On: Feb 08 2018 1:48AM | Last Updated: Feb 08 2018 12:35AMटिटवाळा/कल्याण : वार्ताहर

गेल्या आठवड्यात टिटवाळा-मांडा परिसरात गळ्यापासून मुंडके व कमरेपासून खालचा भाग कापून निर्दयी हत्या करून गोणीत बांधलेल्या अवस्थेतील मृतदेह पोलिसांना आढळून आला होता. या व्यक्तीची हत्या झाल्याच्या संशयातून आरोपींचा छडा लावण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र, अवघ्या सात दिवसात ठाणे ग्रामीण क्राईम ब्रँच पोलिसांनी या हत्येचा छडा लावत आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. सदरची हत्या कौटुंबीक वादातून झाली असून पत्नी सुषमाने तिच्या भाऊ गौतम याच्या मदतीने पतीची निर्दयी हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. रवींद्र शिवगण (30)असे मृत पतीचे नाव आहे.

30 जानेवारी रोजी सायंकाळी 4:30 च्या सुमारास बीपीटी परिसरातील सुरक्षारक्षक राऊंड मारत असताना त्यांना परिसरातून दुर्गंधी येऊ लागली. त्यांनी आसपास पाहिले असता येथील बाजूच्या झुडपात एका प्लॅस्टिकच्या गोणीत काहीतरी बांधून टाकलेले आढळले. याबाबत टिटवाळा पोलीस स्टेशनला कळवल्यानंतर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी ही गोणी उघडून पाहिले असता त्यात एका व्यक्तीचे धड व कमरेखालचा भाग नसलेले मृत शरीर आढळून आले. सुरुवातीला परिस्थितीजन्य असा कुठलाच पुरावा हाती नसताना या गुन्ह्याची उकल करणे हे मोठे आव्हानात्मक होते.

ठाणे ग्रामीण क्राईम पोलीस व टिटवाळा पोलिसांनी याप्रकरणी तपासाची सुत्रे हाती घेतली. तपासादरम्यान मिसिंग केस दाखल असलेल्या माहितीचा आढावा घेत असताना येथील सिद्धिविनायक कॉलनी परिसरात राहणारा रवींद्र शिगवण हा चार दिवसांपासून बेपत्ता असल्याचे समजले. त्या अनुषंगाने रवींद्रची पत्नी सुषमा हिच्याकडे विचारणा केली असता तो आई-वडिलांकडे मुलुंडला गेल्याचे तिने सांगितले. मात्र संबंधित ठिकाणी तसेच त्या रवींद्रच्या कामाच्या ठिकाणी चौकशी केली असता तो 24 जानेवारीपासून कामावर नसल्याचे समजले. पोलिसांनी अखेर मिसिंग दाखल करून तपास सुरू केला. 

दाखल असलेले मिसिंग व धडावेगळा असलेला मृतदेह यांच्यात साम्य आढळून आल्यानंतर रवींद्र शिगवण यांच्या घरी पोलीस माहितीकरीता गेले असता मृतदेहाच्या गोणीला येत असलेला डार्क फिनेलचा दर्प त्यांच्या घरातही जाणवत होता. तसेच भिंतींना पाण्याने धुतल्याचे आढळून आले. मृतदेह सापडलेल्या गोणीला बांधण्यासाठी वापरलेली दोरी व घरात कपडे वाळवण्यासाठी असलेली दोरी यांच्यातही साम्य आढळून आले. पोलिसांनी गुन्हा उघड करण्याच्या दृष्टीने समांतर तपास करत असताना गायब असलेल्या रवींद्रचा मेहुणा गौतम मोहिते (29) याने सपोनि बडाख यांच्याकडे गुन्ह्याची कबुली दिली. त्याचदरम्यान रवींद्रची पत्नी सुषमा व सासू अनिता मोहिते यांची चौकशी चालू असताना पत्नी सुषमा हिनेही गुन्ह्याची कबुली दिली.

या गुन्ह्यातील आरोपी गौतम (29), पत्नी सुषमा व सासू अनिता यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना कल्याण कोर्टात हजर केले असता तिघांना 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांनी दिली.