Wed, Jun 26, 2019 17:31होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विधवेवर बलात्कार करून गर्भपात करणार्‍याला बेड्या

विधवेवर बलात्कार करून गर्भपात करणार्‍याला बेड्या

Published On: Dec 07 2017 2:06AM | Last Updated: Dec 07 2017 1:11AM

बुकमार्क करा

डोंबिवली : वार्ताहर

एका 37 वर्षीय विधवेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर एका नराधमाने वारंवार बलात्कार केला. या अत्याचारामुळे पीडित विधवा गर्भवती राहिल्याचे समजताच या बहाद्दराने तिला चक्क गर्भपात करण्यास भाग पडल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत, नराधमाने तिच्यावर केलेल्या अत्याचाराचा पाढाच वाचला. यावरून मानपाडा पोलिसांनी बलात्कारासह जबरदस्तीने गर्भपात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून नराधमाला अटक केली आहे. अरविंद पाटील असे नराधमाचे नाव असून तो निळजे गावातील एका हायप्रोफाईल सोसायटीमध्ये राहतो.  

पीडित महिला मुळची उत्तरप्रदेश येथील चक्रतीर घाट परिसरात राहणारी असून काही वर्षापूर्वीच तिच्या पतीचे निधन झाले. तिला पतीपासून दोन मुलीही आहेत. या मुलींच्या उदरनिर्वाहसाठी ती कल्याण-शिळ मार्गावरील निळजे गावात राहून त्याच परिसरातील एका ठिकाणी नोकरी करीत आहे. याच दरम्यान नराधम अरविंदने तिच्या असहाय्यतेचा फायदा घेतला. तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर तिच्यावर निळजे गावातील एका खोलीत नेऊन वारंवार बलात्कार केला. 

यातून पीडिता गरोदर राहिली. हे कळताच अरविंद याने गर्भपाताच्या गोळ्या जबरदस्तीने खायला देऊन तिचा गर्भपात केला. या घटनेबाबत कुणाला सांगितल्यास तुझ्या दोन्ही मुलींना जीवे ठार मारेन, अशीही धमकी दिली. या धमकीमुळे पीडित महिला भयभीत झाली होती. मात्र धाडस करून तिने मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपल्यावर गुदरलेल्या सर्व घटनाक्रमांची पोलिसांना माहिती दिली. तिच्या जबानीवरून पोलिसांनी अरविंद पाटील विरोधात गुन्हा नोंदवला. पोलिसांनी नराधम अरविंदला अटक करून त्याला कल्याण न्यायालयात हजर केले असता अधिक चौकशीसाठी त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. याप्रकरणी अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.