Mon, Jun 24, 2019 21:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शाळांच्या सुरक्षेची जबाबदारी  कोणाची?

शाळांच्या सुरक्षेची जबाबदारी  कोणाची?

Published On: Jul 23 2018 1:09AM | Last Updated: Jul 23 2018 12:56AMमुंबई : प्रतिनिधी

राज्य शासनाने 27 नोव्हेंबर 2009 मध्ये काढलेल्या शासन निर्णयाचा आधार घेवून पालिकेच्या शिक्षण विभागाने खासगी शाळांना आपल्या शाळेतील अग्निशमन यंत्रणाचे व शालेय इमारतींचे फायर ऑडिट करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. ही सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोणाची हे अगोदर पालिकेने स्पष्ट करावे, असे मुख्याध्यापक संघटनेने म्हटले आहे.

शाळांच्या इमारतींचे फायर ऑडिट झाले नसल्याची तक्रार नेहमी उपस्थित होते. या तक्रारीवर पालिका शिक्षण विभाग संपूर्ण जबाबदारी व्यवस्थापन व मुख्याध्यापकांकडे देवून हात वर करत आहे, असेही मुख्याध्यापकांचे म्हणणे आहे.

मुंबई परिसरातील सर्व घटकांच्या सुरक्षेची जबाबदारी पालिकेकडे असताना त्यांनी पालिकेच्या शाळा सोडून इतर सर्व  खासगी संस्थांच्या शाळांना सावत्रपणाची वागणूक दिली. कदाचित या सर्व शाळा दुसर्‍या देशातील आहेत. प्रत्येक शाळेत अग्निशमन यंत्रणा आहे. पण ती पुरेशी आहे की त्यात आणखी काही सुधारणा हव्यात, हे सांगण्याकरिता पालिकेच्या अग्निशमन केंद्रातील अधिकार्‍यांनी शाळांना भेट देऊन सुधारणा करण्याचे सूचविणे आवश्यक होते.

त्यानंतर जर शाळांनी सोयी केल्या नसत्या तर याला शाळाप्रमुख जबाबदार असते. मात्र किती शाळांना या अधिकार्‍यांनी 2009 पासून भेटी दिल्या हे जाहीर करावे, विशेष म्हणजे आमच्याकडे सुरक्षेसंदर्भातील राज्य शासनाच्या आदेशावर नऊ वर्षांनी अंमलबजावणी होते, यावरून तत्परता दिसून येते.  हा आदेश खासगी अग्निशमन यंत्रणेच्या कंत्राटदारांना फायदा मिळवून देण्यास काढला असल्याचा आरोप मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे सचिव प्रशांत रमेश रेडीज यांनी केला आहे.