होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मारहाणीचा सूड घेताना भलत्याच तरुणावर चाकूने हल्ला

मारहाणीचा सूड घेताना भलत्याच तरुणावर चाकूने हल्ला

Published On: Sep 05 2018 7:44AM | Last Updated: Sep 05 2018 2:28AMमुंबई ः प्रतिनिधी

क्षुल्लक कारणावरून मारहाण करणार्‍या तरुणाचा सूड घेताना आरोपी तरुणाने चुकून दुसर्‍या व्यक्तीवर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना वांद्रे परिसरात घडली. हल्ल्यात जखमी झालेल्या मकरंद गायधने यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर लिलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. या प्रकरणी गंभीर दुखापतीचा गुन्हा नोंद होताच पळून गेलेल्या आरोपीस तीन तासांत वांद्रे पोलिसांनी अटक केली. 

साहिल शेख असे या आरोपीचे नाव असून त्याने चुकीच्या व्यक्तीवर हल्ला केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गायधने हे वांद्रे परिसरात राहत असून ते इंजिनिअर म्हणून एका खासगी कंपनीत कामाला आहेत. सोमवारी सायंकाळी 6 वा. ते घरापासून काही अंतरावर असलेल्या एका एटीएम सेंटरमध्ये जात होते. यावेळी एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला. चाकू हल्ल्यात मकरंद हे गंभीररीत्या जखमी झाले होते, ही माहिती मिळताच वांद्रे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्यांना तातडीने पोलिसांनी भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल केले, तिथे प्राथमिक उपचारानंतर त्यांना लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांना पंधराहून अधिक टाके लागले असून त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. गायधने यांच्या तक्रारीवरुन वांद्रे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गंभीर दुखापतीचा गुन्हा नोंद करून पळून गेलेल्या आरोपीचा शोध सुरू केला होता.

परिसरातील सीसीटिव्ही फुटेजवरुन अवघ्या तीन तासांत धारावी येथून पळून गेलेल्या साहिल शेख या 23 वर्षांच्या तरुणाला संशयित आरोपी म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत साहिल हा धारावी येथे राहतो. दोन दिवसांपूर्वी तो वांद्रे येथील रंगशारदा परिसरात आला होता. यावेळी तिथे काही तरुण क्रिकेट खेळत होते, क्रिकेट खेळताना त्यांच्यात वाद झाला, हा वाद सोडविण्याचा साहिलने प्रयत्न केला होता. यावेळी एका तरुणाने त्याच्या श्रीमुखात लगावली होती. काही कारण नसताना या तरुणाने मारहाण केल्याने साहिलच्या मनात प्रचंड राग होता. याच रागातून त्याने सूडाने तरुणावर हल्ला करण्याची योजना बनविली होती. त्यासाठी त्याने एक चाकू खरेदी केला होता. सोमवारी गायधने हे रस्त्यावरुन जाताना त्याला मारहाण करणारा तोच तरुण असल्याचे वाटले आणि त्याने त्यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला. 

दहिहंडी असल्याने वांद्रे परिसरात पोलीस बंदोबस्त होता, गायधने यांच्यावर हल्ला समजताच पोलीस घटनास्थळी रवाना झाले.  त्यांना वेळीच हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. सोमवारी झालेल्या हल्ल्यानंतर गायधने कुटुंबिय प्रचंड भयभीत झाले होते, कोणाशी काहीही वैर नसताना अचानक मकरंद यांच्यावर कोणी हल्ला केला असा विचार मनात असताना आरोपीच्या चौकशीतून आलेल्या माहितीनंतर त्यांना धक्काच बसला.