अंबरनाथ : राजेश जगताप
बुद्ध पौणिमा सोमवार 30 एप्रिल रोजी देशभरात मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली. मात्र बुद्ध पौर्णिमा भारतीय दिनदर्शिकेमध्ये 29 एप्रिल रोजी दर्शविण्यात आलेली आहे, ही ऐतिहासिक दृष्टीकोनातून चूक असून येणार्या 29 मे रोजी बुद्ध पौर्णिमा साजरी करावी, असे आवाहन करणारे पत्रक अखिल भारतीय भिक्खू संघाचे अध्यक्ष पु. भदन्त सदानंद महास्थवीर यांनी 25 एप्रिल 2018 रोजी काढल्याने बुद्ध पौर्णिमा साजरी करण्याबाबत संभ्रम निर्माण झाला.
अखिल भारतीय भिक्खू संघ हा बौद्ध धर्मिय भिक्खूंचा सर्वश्रेष्ठ संघ मानला जातो. या संघाने काढलेल्या आदेशाचे पालन सर्वत्र केले जाते. 25 एप्रिल 2018 रोजी अखिल भारतीय भिक्खु महासंघाचे अध्यक्ष पु. भदन्त सदानंद महास्थवीर यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार 29 मे रोजी बुद्ध पौर्णिमा साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या पत्रकामुळे बुद्धपौर्णिमा साजरी करण्याबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र अखिल भारतीय भिक्खु संघाच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करून देशभरात पारंपरिक पद्धतीने वैशाख पौर्णिमेला म्हणजेच 30 एप्रिल रोजी बुद्ध पौर्णिमा साजरी झाली.
बुद्ध पौर्णिमेच्या या तारखेवरून उपस्थित झालेल्या या संभ्रमाबाबत अखिल भारतीय भिक्खू संघाचे अध्यक्ष भदन्त सदानंद महास्थवीर यांना विचारले असता, थायलंड, नाओस हे देश 29 मे रोजी बुद्ध पौर्णिमा साजरी करणार आहेत. हे देश बौद्ध धर्माची हजारो वर्षांची परंपरा जोपासत आहेत. त्यांच्या तुलनेत आमचे ज्ञान अत्यंत कमी आहे. त्यांच्याशी संपर्क केल्यानंतर आम्ही हे पत्रक प्रसिद्ध केले आहे.
30 एप्रिल रोजी देशभर बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात येत असेल तर आमचा विरोध नाही. गौतम बुद्धाने प्रथम जे धम्मचक्र प्रवचन केले ते आषाढ पौर्णिमेला. त्यापूर्वी दोन महिने अगोदर म्हणजेच 29 मे रोजी त्यांना ज्ञान प्राप्ती झाली. त्यामुळे हाच दिवस बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरा केला जावा. मात्र अधिक मास आल्यामुळे हा घोळ वाटतो. हा तारखेचा घोळ इतर बौद्ध धर्मीय देशांमध्येही असल्याचे त्यांनी बोलताना स्पष्ट केले.
Tags : Mumbai, mumbai news, Buddha Purnima ,When , 29th of April 30