Wed, Jul 24, 2019 12:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'ती लवकर उठत नाही, जेवण बनवत नाही' हे घटस्फोटाचे कारण नाही

'ती लवकर उठत नाही, जेवण बनवत नाही' हे घटस्फोटाचे कारण नाही

Published On: Mar 03 2018 1:46AM | Last Updated: Mar 03 2018 1:46AMमुंबई : प्रतिनिधी

सकाळी बायको लवकर उठत नाही, रुचकर जेवण तयार करीत नाही, तसेच आपल्यासाठी विशेष वेळ देऊन पत्नीधर्माचे पालन करीत नाही अशा कारणास्तव घटस्फोट मागणार्‍या एका पतीपरमेश्‍वराची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. शिवाय ही काही कौटुंबिक क्रुरता नव्हे, असेही न्यायमूर्ती के. के. तातेड व सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने सुनावले आहे. 

आपली पत्नी पत्नीधर्मास जागत नसल्याची तक्रार करीत सांताक्रूझ येथील एका पतीदेवाने घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयाकडे दाद मागितली होती. मात्र, त्याने दिलेली कारणे तकलादू ठरवीत न्यायालयाने त्याची याचिका निकाली काढली होती. त्यानंतर त्याने उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. परंतु, तेथेही न्यायालयाने त्याची याचिका फेटाळून लावताना कौटुंबिक न्यायालयाचा आदेश उचलून धरला आहे. 

घटस्फोटासाठी न्यायालयात धाव घेणार्‍या या पतीची पत्नी नोकरी करते. त्याशिवाय घरातील रेशन, भाजीपाला आदी तदनुषंगिक खरेदीही तिलाच करावी लागते. घरातील इतर कामांबरोबरच सासू-सासर्‍यांपासून  सर्वांसाठी जेवणही तिलाच बनवावे लागते, याकडेही न्यायालयाने लक्ष वेधतानाच सदर स्त्री जेवण चांगलं बनवत नाही, वा पत्नीव्रताची कामे पूर्ण करीत नाही या आरोपात तथ्य नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. उच्च न्यायालयात धाव घेताना या नवरोबाने कौटुंबिक न्यायालयाने दिलेल्या निवाड्यात चूक असल्याचा दावा केला होता. त्याने आपल्या पत्नीवर आरोप करताना त्याला पुरावा म्हणून आपल्या वडिलांचे निवेदन जोडले होते.

सदर पत्नीला सकाळी उठवायला गेले तर ती आपल्याबरोबरच कुटुंबातील सदस्यांनाही शिवीगाळ करते, आपण कामाच्या ठिकाणाहून संध्याकाळी सहा वाजता घरी परतलो तरी त्यावेळी पत्नी डुलकी घेत असते, तसेच रात्रीचे जेवणही साडेआठ वाजता तयार करते आदी आरोपही केले होते. या नवरोबांनी न्यायालयापुढे आणखीही तक्रारीचा पाढा वाचला होता. त्यामध्ये ती पुरेसे व चवदार जेवण तयार करीत नाही, आपल्यासाठी वेळ काढीत नाही, आपल्याला कार्यालयातून परतण्यास कधी वेळ झाला तर साधे 1 ग्लास पाणीही देत नाही, अशा आरोपांचा समावेश होता. 

मात्र, त्याच्या पत्नीने आपण नोकरीसाठी घराबाहेर पडण्यापूर्वी संपूर्ण कुटुंबासाठी जेवण तयार करीत असतो, असे सांगून नवर्‍याचे सर्व आरोप फेटाळून लावले होते. शिवाय आपण घरातील कामात कसे व्यस्त असतो, आपण कसे चवदार जेवण तयार करतो यासाठी तिने शेजारी व आपल्या नातेवाईकांचीही साक्ष काढली होती. तसेच, पतीचे कुटुंबच आपल्यावर अत्याचार करीत असल्याचा आरोप तिने केला होता.