Mon, Aug 19, 2019 11:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बेवारस मुले व महिलांच्या सुरक्षेसाठी पश्चिम रेल्वेचा पुढाकार

बेवारस मुले व महिलांच्या सुरक्षेसाठी पश्चिम रेल्वेचा पुढाकार

Published On: Jun 19 2018 1:31AM | Last Updated: Jun 19 2018 1:14AMमुंबई : प्रतिनिधी

मुंबईत वेगवेगळ्या कारणांनी घरातून पळून जाणारी मुले बर्‍याचदा रेल्वे स्थानक आवारात सापडतात. या मुलांना वेळीच पुन्हा पालकांकडे पाठवणे किंवा सुरक्षित आश्रय देणे आवश्यक असते. ही बाब लक्षात घेत पश्चिम रेल्वेने बेवारस स्थितीत आढळणार्‍या मुलांच्या संरक्षणाकडे विशेष लक्ष पुरवले आहे. मागीलवर्षी पश्चिम रेल्वेच्या हद्दीतून 1008 मुलांची सुटका करण्यात आली. त्यात 673 मुलांचा आणि 335 मुलींचा समावेश होता. यावर्षी मेपर्यंत 330 मुला-मुलींची सुटका करण्यात आली असून त्यात 220 मुले असून 110 मुली आहेत. 

देशभरातून अनेक मुले घरदार सोडून मुंबईत दाखल होतात. घरगुती भांडणे, बॉलिवूडचे आकर्षण अशा विविध कारणांमुळे अल्पवयीन मुले मुंबईत येतात. त्यांना घरी न पाठवल्यास किंवा सुरक्षित निवारा न मिळाल्यास ही मुले वाममार्गास लागण्याची भीती असते. हे लक्षात घेत रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्‍वनी लोहानी यांनी रेल्वे हद्दीत सापडलेल्या बेवारस मुलांची त्यांच्या कुटुंबीयांशी भेट घालून देण्यासाठी विशेष लक्ष पुरवण्याची सूचना केली होती. त्यासाठी नियमात असलेल्या प्रक्रियेचा आधार घ्यावा, असेही स्पष्ट केले आहे. त्याचा आधार घेत पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस, सुरत, बडोदा, अहमदाबाद, राजकोट, रतलाम आदी स्थानकांवर सापडलेल्या बेवारस मुलांना कुटुंबीयांशी पुनर्भेट करून देण्यात येत आहे किंवा स्थानिक पोलिसांच्या हाती सोपवण्यात येत आहे.                  

देशाची आर्थिक राजधानी असणार्‍या मुंबईला जगातील पहिली महिला लोकल पश्‍चिम रेल्वेने दिली आहे. रेल्वेतील महिलांच्या व निराधार बालकांच्या सुरक्षेसाठी पश्‍चिम रेल्वेने 2018-19 हे वर्ष महिला आणि बाल सुरक्षा  वर्ष म्हणून जाहीर केले. यासाठी पश्‍चिम रेल्वेने 4 जुन ते 8 जुन या काळात विविध स्थानकांवर वेगवेगळे कार्यक्रम व अभियान राबविले. यातून महिलांकडून सुरक्षा संबंधीत महत्त्वाच्या सुचना मागविल्या. या अभियानात सुमारे 488 महिलांनी आपल्या सुचना रेल्वे विभागाकडे नोंदवल्या आहेत. महिला प्रवासी यात्री संवाद या सुरक्षेचा आढावा घेणार्‍या कार्यक्रमासाठी स्वत: रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक ए.के. गुप्ता स्वत: हजर राहिले होते.    

या अभियानाअंतर्गत महिलांच्या डब्यातून प्रवास करणार्‍या 27 भिकारी, 168 पुरुष प्रवासी आणि 39 अवैध विक्रेत्यांना पकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. तसेच दरवाजात उभ्या राहून इतर महिलांवर दादागिरी करणार्‍या 30 महिलांना ताब्यात घेण्यात आले. शिवाय रेल्वे सुरक्षा बलाच्या सहकार्याने महिला प्रवाशांच्या प्रवासादरम्यान होणार्‍या छेडछाडीच्या घटनांवर आळा बसावा यासाठी प्रयत्न करण्यात आले. ज्यात महिला डब्याच्या आसपास भटकणार्‍या संशयीतांवर नजर ठेवण्याच्या सुचना रेल्वे सुरक्षा बलाला दिल्या. अधिक गर्दीच्या काळात महिला डब्यात आरपीएफच्या कर्मचार्‍यांची संख्या अधिक करण्यावर भर दिला जाणार असल्याचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले.