Sat, Apr 20, 2019 10:02होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्य बँक प्रशासकांच्या स्वागताची कर्मचार्‍यांना सक्ती

राज्य बँक प्रशासकांच्या स्वागताची कर्मचार्‍यांना सक्ती

Published On: Jun 13 2018 1:49AM | Last Updated: Jun 13 2018 1:25AMमुंबई : चंदन शिरवाळे

आर्थिक अनियमिततेमुळे 2001 पासुन प्रशासक नियुक्त असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत मंगळवारी इतिहास घडला. बँकेच्या इतिहासात प्रथमच नवनियुक्त प्रशासकांच्या स्वागतासाठी कर्मचार्‍यांना सक्ती, फटाक्यांची आतषबाजी, औक्षण व फुलांची उधळण करण्यात आली. 

राज्यातील सहकारी बँकेची शिखर संस्था म्हणुन महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ओळखली जाते. या बँकेतुन साखर कारखाने, सुतगिरण्या व सहकारातुन उभ्या राहणार्‍या संस्थांना कर्जपुरवठा केला जातो. विविध सहकारी संस्थांच्या उभारणीमध्ये मोठा हातभार असलेल्या या बँकेवर आर्थिक अनियमितता झाल्याचा ठपका बसल्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संचालक मंडळ बरखास्त करुन बँकेवर प्रशासकांची नियुक्ती केली होती. एम.एल.सुखदेवे हे प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष तर ए.ए.मगदूम आणि के.एन. तांबे हे सदस्य होते. 

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर सत्ताधार्‍यांनी नियुक्त केलेल्या प्रशासकांनी बँकेच्या कारभारात हस्तक्षेप सुरु केल्यामुळे नाराज झालेल्या डॉ.सुखदेवे, मगदूम आणि तांबे यांनी आपआपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे प्रशासकीय मंडळाचे अध्यक्षपद रिक्त होते. बँकेचा कारभार आणि निर्णय घेण्यास अडचणी निर्माण झाल्यामुळे सहकार आयुक्त विकास झाडे यांनी विद्याधर अनास्कर, संजय भेंडे व अविनाश महागावकर यांचे प्रशासक मंडळ बरखास्त करुन अनास्कर यांची नवीन प्रशासक म्हणुन तर त्यांच्या मदतीसाठी स्थापन केलेल्या समितीचे सदस्य म्हणुन भेंडे व महागावकर यांची नियुक्ती केली. 

नियुक्तीनंतर मंगळवारी सकाळी 11 वाजता अनास्कर प्रथमच बँकेत येणार होते. त्यांच्या स्वागतासाठी रांगोळी काढण्यात आली. ते येण्यापुर्वी कर्मचार्‍यांना कामे थांबवुन मुख्य कार्यालयाच्या प्रवेशव्दारावर हजर राहण्चाचे फर्माण सोडण्यात आले होते. तर औक्षणासाठी महिलांना ताटकळत ठेवले होते. अनास्कर येताच फटाक्यांची आतषबाजी आणि फुलांची उधळण करण्यात आली. दुसर्‍या मजल्यावर गुलाबांच्या पाकळ्या अंथरत्या होत्या. तेथुन अनास्कर यांना नेण्यात आले. 

मुख्यालयाच्या चवथ्या मजल्यावरील सभागृहात अनास्कर यांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे नऊ महिन्यांपुर्वी सेवानिवृत्त झालेले व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड यांचा निरोप समारंभ या कार्यक्रमात करण्यात आला. या समारंभाचे सुत्रे व्यवस्थापकीय संचालक राजेश बायस यांच्याकडे न देता बँकेचे निवृत्त अधिकारी, विशेष कार्यअधिकारी अजित देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आली होती. या प्रकाराने बँकेतील कर्मचारी संतप्त झाले होते.