Sun, Jul 21, 2019 08:14होमपेज › Mumbai-Thane-Raigad › साप्ताहिकांचे दोन खंडणीखोर संपादक गजाआड

साप्ताहिकांचे दोन खंडणीखोर संपादक गजाआड

Published On: May 19 2018 1:33AM | Last Updated: May 19 2018 1:05AMठाणे : खास प्रतिनिधी

माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवून भिवंडी पंचायत समितीच्या उपअभियंत्याला 40 लाखांच्या खंडणीसाठी गुंडामार्फत ठार मारण्याची धमकी देणार्‍या दोन साप्ताहिकांच्या संपादकांना ठाणे खंडणी विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या. गुरूवारी सायंकाळी ठाणे शासकीय विश्रामगृहाबाहेरील रस्त्यावर पोलिसांनी सापळा रचून 10 लाखांच्या खंडणीचा पहिला हप्ता स्वीकारताना भिवंडीतील रंगनाथ हरिभाऊ तांडगी (44) आणि ठाण्यातील पांडुरंग बेनके (52) या दोन खंडणीखोर पत्रकारांना रंगेहाथ पकडले. 

भिवंडी पंचायत समितीमध्ये शाखा अभियंता म्हणून कार्यरत असलेले दत्तू गिते यांच्याकडे उपअभियंता म्हणून अतिरिक्त कार्यभार आहे. या अधिकार्‍याला साप्ताहिक शब्ददूतचे संपादक रंगनाथ तांगडी (रा. खरडी, भिवंडी) आणि साप्ताहिक भाग्योदय वृत्तचे संपादक पांडुरंग बेनके रा. वसंत लॉन्स ठाणे यांनी संगनमत करून फेब्रुवारी 2017 पासून बदनामीकारक मजकूर छापण्यास सुरूवात केली. माहितीच्या अधिकाराखाली त्यांच्या कामकाजासह व्यक्तीगत माहिती मागविली. ती माहिती न छापण्यासाठी तांडगी यांनी 40 लाख तर बेनके यांनी 25 लाख रुपयांची मागणी गिते यांच्याकडे केली. ही रक्कम न दिल्यास गुंडाकरवी संपवून टाकण्याची धमकी देत आतापर्यंत दीड लाख रुपये उकळले होते. तरी देखील खंडणीसाठी त्रास देण्याचा प्रकार न थांबल्याने गिते यांनी ठाणे खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार केली. 

या गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुरूवारी आरोपी  रंगनाथ तांगडी यांनी उपअभियंता गिते यांना भिवंडीतील कार्यालयात गाठून 40 लाखांसह ठाणे शासकीय विश्रामगृहासमोरील रोडवर येण्यास सांगितले. धक्कादायक बाब म्हणजे विश्रामगृहासमोरच खंडणी विरोधी पथकाचे कार्यालय आहे. ही माहिती कळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा आणि पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सायंकाळी साडेआठ वाजात सापळा रचून आरोपींना खंडणीचे 10 लाख रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले. त्यांच्या विरोधात ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींची गुन्हे करण्याची पद्धत पाहता त्यांनी विविध शासकीय कार्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ अधिकार्‍यांची माहिती अधिकार कायद्यान्वये माहिती मागवून तसेच साप्ताहिकात वृत्त छापून खंडणी उकळली आहे. तरी या आरोपींकडून शासकीय अधिकार्‍यांना त्रास झाला असल्यास खंडणी विरोधी पथक कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

खंडणीप्रकरणी माहितीचा अधिकार कार्यकर्ता गजाआड

कळव्यातील  मुंबई-पुणे रोडवरील सुकुर पार्क येथील श्रद्धाज किचन या हॉटेलच्या वाढीव शेडच्या विरोधात तसेच शेजारील दुकानांचे विरोधात ठाणे महापालिका व कळवा वॉर्ड ऑफिसमध्ये माहितीचा अधिकाराअंतर्गत अर्ज व तक्रारी करणारा  सुनिल बबन साळुंके रा. भोलानगर याला ठाणे खंडणी विरोधी पथकाने गुरूवारी पाच लाखांच्या खंडणीप्रकरणी गजाआड केले. माहितीचा अधिकाराचा वापर करून हॉटेल मालक नारायण सुवर्णा यांच्याकडून खंडणी उकळली होती. माझे अंडरवर्ल्डशी संबंध असून खंडणी न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती.