Thu, Apr 25, 2019 12:11होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे-मुंबईसह इतर शहरांचा दूधपुरवठा बंद करू

ठाणे-मुंबईसह इतर शहरांचा दूधपुरवठा बंद करू

Published On: May 04 2018 1:49AM | Last Updated: May 04 2018 1:25AMमुंबई : प्रतिनिधी

सरकारने दूध दरवाढीचे आश्‍वासन देऊनही ते न पाळल्याच्या निषेधार्थ दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने राज्यभर फुकट दूध वाटप करून सरकारचा निषेध नोंदवला आहे. सरकारने दुधाला प्रतिलिटर 27 रुपये दर देण्याच्या अध्यादेशाची त्वरित अंमलबजावणी केली नाही, तर मात्र ठाणे-मुंबईसह इतर शहरांचा दूधपुरवठा बंद करू, असा संतप्त इशारा दूध उत्पादक संघर्ष समितीचे डॉ. अजित नवले यांनी दिला आहे.

मागील जूनमध्ये केलेल्या संपानंतर सरकारने 26 जून रोजी काढलेल्या पत्रकात दुधाला 27 रुपये प्रतिलिटर असा दर देण्याचे कबूल केले होते. मात्र, दहा महिने उलटून गेले तरी सरकारने गुणवत्तापूर्वक दुधाला एकही रुपया वाढवून दिला नाही. तेव्हापासून शेतकरी 10 रुपये तोट्यानेच दूध विकत आहेत.फुकटात दूध वाटपाचे हे आंदोलन 9 मेपर्यंत चालणार आहे. सर्वच जिल्ह्यांत हे आंदोलन होणार असून 9 मेपर्यंत 27 रुपये भाव न मिळाल्यास दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीशी चर्चा करून पुढचे पाऊल उचलले जाईल. प्रसंगी ठाणे-मुंबईसह इतर शहरांचा दूधपुरवठा बंद करू, असा इशाराही डॉ. नवले यांनी दिला आहे. एकीकडे पिण्याचे पाणी 20 रुपये लिटरने विकले जात असताना, गुणवत्तापूर्वक दुधाला मात्र अवघा 17 रुपये दर मिळत आहे. याचवेळी शहरी ग्राहकांना मात्र 40 ते 42 रुपये लिटरने विकले जाते. राज्यात जो काही दूध पुरवठा होतो, त्यातील सव्वा कोटी लिटर दूध पुरवठा हा ग्रामीण महाराष्ट्रातून होतो. असे असताना दूध उत्पादकांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

...तर दूध टँकर फोडू 

 सांगली जिल्हा दूध उत्पादक संघर्ष समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास दुधाचा अभिषेक घालून सरकारचा निषेध करत लोकांना मोफत दूध वाटप करण्यात आले. दूध दरात आठ दिवसात वाढ न झाल्यास जिल्ह्यातून बाहेर जाणारे दुधाचे टँकर फोडण्यात येतील, असा इशारा समितीचे नेते महेश खराडे यांनी दिला आहे.

Tags : Mumbai, We,  stop, supply, milk, cities, Thane, Mumbai