Thu, Jun 20, 2019 20:42होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘गोकुळ’ गैरव्यवहाराची चौकशी

‘गोकुळ’ गैरव्यवहाराची चौकशी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) लेखापरीक्षण अहवालात आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी जे आक्षेप घेण्यात आले आहेत, त्यांची येत्या दोन ते तीन महिन्यांत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे आश्‍वासन दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिले. आ. सतेज पाटील यांनी ही लक्षवेधी सूचना मांडली.

‘गोकुळ’ने 2015-16 मध्ये कार्यक्षेत्राबाहेरील गाय आणि म्हशीचे दूध संकलन करून त्याचे रूपांतर पावडर, लोणी अशा दुग्धजन्य पदार्थांमध्ये केले. त्यामुळे संघाचे,  पर्यायाने दूध उत्पादक शेतकर्‍यांचे  कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचे पाटील म्हणाले.

संचालकांच्या वाहनांवर 2 कोटींची उधळण

‘गोकुळ’चे संचालक आणि अधिकार्‍यांच्या 31 वाहनांवर दरवर्षी 2 कोटी 31 लाख 86 हजार खर्च केला जात आहे. संचालकांसाठी 20-20 लाख रुपयांच्या स्कॉर्पिओ गाड्या खरेदी करून आर्थिक उधळपट्टी चालविली आहे. लेखापरीक्षण अहवालातदेखील याबाबत ठपका ठेवण्यात आला आहे.  याबाबत सरकारकडे तक्रार करून सहा महिने झाल्यावरही कारवाई केली जात नसल्याचे सांगून पाटील यांनी, ‘गोकुळ’मधील गैरव्यवहारांची चौकशी करण्याची मागणी केली.

ब्रँड टिकावा; पण मनमानी नको

‘गोकुळ’ हा ब्रँड टिकावा हा आमचा उद्देश असून, हे करत असताना दूध उत्पादक शेतकर्‍यांचाही फायदा झाला पाहिजे. मात्र, ‘गोकुळ’च्या  संचालक मंडळाकडून शेतकर्‍यांनी मागणी करूनही त्यांना दुधाचा दर वाढवून दिला जात नाही. उलट आर्थिक अनियमितता करून संचालक मंडळाकडून संघाचे नुकसान करण्याचे काम सुरू आहे. दूध संघाची सर्वसाधारण सभाही बेकायदेशीररीत्या पार पाडणार्‍या व मनमानी कारभार करणार्‍यांची चौकशी करण्याची गरज असल्याचे पाटील म्हणाले.

लेखापरीक्षण तक्रारींची नोंद घेणार

त्यावर उत्तर देताना महादेव जानकर यांनी, लेखापरीक्षण अहवालात नोंदविण्यात आलेल्या सर्व आक्षेपांची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले. लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून सतेज पाटील यांनी जे मुद्दे उपस्थित केले, त्याबाबत त्यांच्याशी चर्चा करून चुकीचे काम झाले असेल, तर त्यावर निश्‍चितच कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Tags : mahadev jankar, kolhapur Gokul Milk producer association, corruption. 


  •