Tue, Jun 25, 2019 13:18होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुखर्जी पुन्हा राजकारणात? 

मुखर्जी पुन्हा राजकारणात? 

Published On: Jun 10 2018 2:02PM | Last Updated: Jun 10 2018 3:54PMमुंबई/ नवी दिल्‍ली : प्रतिनिधी - वृत्तसंस्था

नागपूरात संघस्थानी भेट दिल्यामुळे राजकीय चर्चेचे केंद्रबिंदू  ठरलेले माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी पुन्हा सक्रीय राजकारणात उतरण्याची आवई शिवसेनेने रविवारी उठवून दिली. त्यामुळे प्रणवकन्या शर्मिष्ठा यांनाही लगबगीने या बातमीचे खंडन करावे लागले.

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला अपेक्षित यश मिळण्याची शक्यता फारच कमी आहे, असा अंदाज  बांधतानाच शिवसेनेचे प्रवक्‍ते व खासदार संजय राऊत यांनी एका वृत्तसंस्थेस सांगितले की, 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकांत अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींऐवजी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जीचे नाव पुढे केले जाईल.

पुढील वर्षी होणार्‍या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत भाजपच्या किमान 110 जागा कमी होतील. तरीही  सत्ता आपल्याकडेच राखण्यासाठी संघाने आतापासूनच रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे. भाजपला सत्तेची जुळवाजुळवा न जमल्यास संघाकडून मोदींऐवजी प्रणव मुखर्जी यांच्यासारखा सर्वमान्य चेहरा पुढे करण्याची खेळी खेळली जाऊ शकते असे, राऊत  म्हणाले. 

सेनेने ही चर्चा सुरू करताच प्रणव मुखर्जी यांची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी यांनी तातडीने ट्विट करीत अशी काही  शक्यता फेटाळून लावली. खासदार राऊत यांना थेट उद्देशून शर्मिष्ठा म्हणाल्या, मिस्टर राऊत, राष्ट्रपती म्हणून निवृत्त झाल्यानंतर माझे वडील पुन्हा सक्रीय राजकारणात पडणार नाहीत.  

विशेष म्हणजे सेनेचे  पक्षप्रमुख उद‍्धव ठाकरे यांनीही सामनातील आपल्या अग्रलेखात मुखर्जी सक्रीय राजकारणात येऊ शकतात असे संकेत दिले होते. संघाने मुखर्जींना शिक्षावर्गासमोर भाषण करण्यासाठी दिलेल्या निमंत्रणामागे हाच अजेंडा असून दिल्‍लीतही तशी चर्चा आहे. याकडे उद‍्धव  यांनी लक्ष वेधले. मुखर्जींनी संघाचे निमंत्रण स्विकारणे काँग्रेसला रुचले नाही. आणि संघस्थानी भाषण करताना मुखर्जी तरी काय असे बोलले? देशावर प्रेम करा, देशाच्या विविधतेवर प्रेम करा, बंधुभावाने रहा असे मुखर्जी म्हणाले आणि संघानेही त्यावर टाळ्या  वाजवल्या. असे उद‍्धव म्हणतात. 

सुरूवातीला काँग्रेसने प्रणव मुखर्जी यांच्या संघस्थानावरील व्याख्यानास विरोध दर्शविला होता. मात्र मुखर्जी यांनी संघाच्या व्यासपीठावरून एक धर्म एक देश असु शकत नाही, असे सांगितल्यानंतर काँग्रेसने आपली विरोधाची भूमिका बदलली. जे आमच्या मनात होते तेच मुखर्जी बोलले असे काँग्रेसकडून सांगण्यात आले. तर भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी सरसंघचालक मोहन भागवत आणि मुखर्जी दोघांचेही कौतुक केले.