Fri, Jul 19, 2019 23:02होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नवी मुंबई विमानतळावर पोहोचण्यासाठी जलमार्ग

नवी मुंबई विमानतळावर पोहोचण्यासाठी जलमार्ग

Published On: Dec 07 2018 1:48AM | Last Updated: Dec 07 2018 1:46AM
मुंबई : विशेष प्रतिनिधी 

नवी मुंबई विमानतळ पूर्ण होण्याआधी तेथे पोहचण्यासाठी जलमार्ग तयार झालेला असेल. व्हेनिसच्या विमानतळावर नदीमार्गे प्रवास करत आपण पोहचलो होतो. असाच जलमार्ग आता नवी मुंबई विमानतळासाठी तयार करू, अशी घोषणा केंद्रीय रस्ते तसेच नौकानयनमंत्री नितीन गडकरी यांनी केली. 

तुहीन सिन्हा लिखित ‘इंडिया इंस्पायर रिडीफायनिंग द पॉलिटीक्स ऑफ डीलिव्हरन्स’ या पुस्तकाचे प्रकाशन नितीन गडकरी यांच्या हस्ते गुरुवारी रंगशारदा येथे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उद्योगपती रतन टाटा, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार उपस्थित होते. 

गडकरी म्हणाले, मला जे शिकायला मिळाले ते मुंबई शहरात. आपण देशात 12 एक्सप्रेस हायवे बनवले. मुंबई - दिल्ली एक्सप्रेस हायवेही आता तयार केला जाणार आहे. त्यामुळे हे अंतर 120 कि.मी.ने कमी होईल आणि 12 तासात दिल्लीला जाता येईल असे सांगतानाच निर्णय घेण्यासाठी कधी घाबरू नये आणि त्यासाठी उशीरही करू नये. मी एखादा निर्णय मनात घेतला तर तो पूर्ण करतोच, असेही त्यांनी ठासून सांगितले.