Mon, Aug 19, 2019 09:53होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जलयुक्त शिवारमधून ११,२४७ गावे जलपरिपूर्ण

जलयुक्त शिवारमधून ११,२४७ गावे जलपरिपूर्ण

Published On: Apr 12 2018 1:26AM | Last Updated: Apr 12 2018 12:52AMमुंबई : प्रतिनिधी

जलयुक्त शिवार योजनेसाठी तीन वर्षांत 16,521 गावांची निवड करण्यात आली. त्यापैकी 11,247 गावे जलपरिपूर्ण झाली असून उर्वरित गावे जूनअखेर पूर्ण करावीत. पुढील वर्षासाठी निवड करण्यात आलेल्या 6200 गावांत तातडीने कामे सुरु करावीत.त्याचबरोबर शेततळी, विंधन विहिरींच्या कामाला गती द्या, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, विंधन विहिरी, गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई व शबरी घरकुल योजनांचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी  मंत्रालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बुधवारी आढावा घेतला. जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, मुख्य सचिव सुमित मल्लिक यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जलयुक्त शिवार योजनेत निवडलेल्या गावांपैकी 11,247 गावांतील कामे पूर्ण होऊन ती जलपरिपूर्ण झाली आहे. गेल्या वर्षी निवडलेल्या 5031 गावांतील कामांना गती देऊन जून अखेरपर्यंत ती पूर्ण करण्यासाठी नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, नंदूरबार, उस्मानाबाद, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांत योजनेचे काम 80 टक्क्यांपेक्षा जास्त झाल्याबद्दल त्यांनी जिल्हाधिकार्‍यांचे कौतुक केले. 

जलयुक्त शिवार योजनेसाठी निधीची कुठलीही कमतरता नसून ही कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी एक हजार कोटी रुपयांचा निधी उद्या वितरित करण्यात येणार आहे. कोकण भागात पावसाळ्यात भरपूर पाणी असते, मात्र उन्हाळ्यात टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागतो. अशा भागात विशेष लक्ष देऊन योजनेची अंमलबजावणी करावी, जेणेकरुन या भागाला भविष्यात टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची गरज भासणार नाही, असे ते म्हणाले. 

 76 हजार शेततळ्यांची कामे पूर्ण

राज्यात मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत 1 लाख 12,311 शेततळ्यांचे उद्दिष्ट असून पैकी 34 जिल्ह्यांत 76,106 शेततळी पूर्ण झाली आहेत. अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक 8,099 शेततळी पूर्ण करण्यात आली आहे. नरेगा, धडक सिंचन विहिरी, 11 हजार सिंचन विहिरी योजनेअंतर्गत राज्यात आतापर्यंत 1 लाख 265 विहिरींचे काम पूर्ण झाले आहे. म. गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत 33 जिल्ह्यांत 76,689 विहिरींचे काम प्रगतीपथावर आहे. गाळमुक्त धरण अभियानांतर्गत 2900 धरणांतून आतापर्यंत 1 कोटी 40,97,856 घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. 

यावेळी मुख्यमंत्र्यांनी शबरी, रमाई घरकुल योजनेचा आढावा घेतला. ग्रामीण भागातील प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 10 लाख लाभार्थ्यांची नोंदणी झाली असून त्यांना घर बांधणीचा पहिला हप्ता तातडीने वितरित करावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. 

Tags : mumbai news,Water yukta shivar, 11247 villages, perfect water,