Fri, Sep 21, 2018 07:32होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डोंबिवलीतील पेट्रोलपंपावर पाणीमिश्रित इंधन?

डोंबिवलीतील पेट्रोलपंपावर पाणीमिश्रित इंधन?

Published On: Feb 25 2018 1:42AM | Last Updated: Feb 25 2018 1:22AMडोंबिवली : वार्ताहर

डोंबिवलीतील उष्मा पेट्रोल पंप जणू फसवणूक करण्याचे ठिकाण झाले आहे. येथे पेट्रोलमध्ये पाणी मिसळले जात असल्याच्या अनेक तक्रारी येत असल्याचा आरोप करत शनिवारी शिवसेना शाखाप्रमुख संदीप नाईक यांनी या पंपावर जाऊन बाटलीमध्ये पेट्रोल द्या, अशी मागणी केली. मात्र तेथील कर्मचार्‍यांनी उडवाउडवीची उत्तर देत पेट्रोल देण्यास नकार दिला.

गेल्या अनेक दिवसांपासून कल्याण-डोंबिवलीतील पंपांवर पाणीमिश्रीत इंधन मिळत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या तक्रारींचा शनिवारी अचानक स्फोट झाला. शाखाप्रमुख नाईक यांनी उष्मा पंपावर जाऊन तक्रारींबाबत येथील कर्मचार्‍यांना जाब विचारला. तसेच पेट्रोल बाटलीमध्ये मागितले. तसे केल्यास पंप चालकाचा बोगसपणा उघड होईल, अशी भीती वाटल्याने कर्मचारी वाद घालू लागले. त्यामुळे नाईक यांनी शिवसेना स्टाईलने उत्तर देत तेथेच ठिय्या आंदोलन केले. हा प्रकार पाहताच पेट्रोल भरायला आलेल्या वाहनधारकांनीही गाड्या तिथेच पार्क करून आंदोलनास पाठिंबा दिला. वातावरणात तणाव निर्माण झाल्याने मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पेट्रोल चालकावर गुन्हा नोंद करतो, पण आंदोलन मागे घ्या, अशी विनंती केली. त्यानंतर तात्पुरते आंदोलन मागे घेण्यात आले.