Wed, Apr 24, 2019 19:53होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई महापालिकेचे दावे पाण्यात!

मुंबई महापालिकेचे दावे पाण्यात!

Published On: Jun 08 2018 1:23AM | Last Updated: Jun 08 2018 1:15AMमुंबई : प्रतिनिधी 

मुंबईत पाणी तुंबणार नाही, हा मुंबई महापालिकेने केलेला दावा गुरुवारी किरकोळ पडलेल्या पावसातच वाहून गेला. गुरुवारी सकाळी मुंबईवर धडकी भरावी असे काळे महाकाय ढग दाटून आले आणि मुसळधार पावसाच्या नुसत्या अंदाजानेही धडकी भरली. त्या तुलनेत जोरदार म्हणता येतील अशा सरी मुंबईवर कोसळल्या, पण या अत्यल्प पावसातही मुंबईच्या सर्वच सखल भागांमध्ये पाणी तुंबले आणि तुंबलेल्या पाण्याच्या लाटांवर पालिकेच्या कंत्राटदारांनी साफ केलेला कचरा तरंगू लागला. या पावसाचा फटका लोकल आणि विमान वाहतुकीलाही बसला. किमान 30 ठिकाणी झाडे उन्मळून पडली. सायनसह अन्य चार ठिकाणी पाणी तुंबल्यामुळे बेस्टसह अन्य वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली.

मुंबईत पहाटेपासूनच रिमझिम पावसाची सुरुवात झाली. काही भागात मात्र जोरदार सरी पडल्या. पावसामुळे साचलेल्या पाण्याचा वेळीच निचरा न झाल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडसह सुमारे 27 ठिकाणी रस्त्यावर पाणी तुंबले होते. सायन रोड नंबर 24, किंग्ज सर्कल, हिंदमाता, वांद्रे येथे रस्त्यावर पाणी तुंबल्यामुळे या रस्त्यावरून धावणार्‍या 20 मार्गावरील बस पर्यायी मार्गाने वळवण्यात आल्या. त्यामुळे या भागात मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. पश्‍चिम द्रुतगती महामार्गासह एस. व्ही. रोड, काळबादेवी रोड, दादर टिळक पूल, किंग्ज सर्कल, चेंबूर, वांद्रे लिंक रोड आदी भागांत मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. 

गटारांच्या साफसफाईकडे दुर्लक्ष 

पालिकेने नालेसफाईकडे लक्ष केंद्रित केल्यामुळे गटारांच्या साफसफाईकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे पावसाचे पाणी गटारातून नाल्यापर्यंत वाहून न जाता ते रस्त्यावर आले. त्यामुळे पालिकेने आता सफाई कामगारांना गटाराच्या साफसफाईकडे लक्ष देण्याचे निर्देश दिले आहेत.

पालिकेचा दावा बनावट

यंदा 100 टक्के नालेसफाई झाल्याचा दावा केवळ पालिका प्रशासनाने नाही तर, सत्ताधारी शिवसेनेनेही केला होता. हा दावा पहिल्याच पावसाने फोल ठरवला आहे. त्यामुळे गुरुवारी मुंबईकरांना जो त्रास सहन करावा लागला त्याला सर्वस्वी शिवसेना व प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे. 

तलाव क्षेत्रातही पाऊस दाखल

शहराला पाणीपुरवठा करणार्‍या मोडक सागर, तानसा, विहार, तुळसी, मध्य वैतरणा, भातसा तलावाच्या पाणलोट क्षेत्रात गुरुवारी सकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तलाव क्षेत्रात 12 तासांत 13 मिमी ते 44 मिमी पावसाची नोंद झाली आहे.