Fri, Nov 16, 2018 01:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बोजवारा; पाणी पोहोचण्यापूर्वीच टाकीला गळती!

बोजवारा; पाणी पोहोचण्यापूर्वीच टाकीला गळती!

Published On: Apr 20 2018 9:56AM | Last Updated: Apr 20 2018 9:56AMमोखाडा : हनिफ शेख

मुदत संपुनही काम पूर्ण होत नसलेल्या बेरीस्ते पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा सुरू होण्यापूर्वीच बोजवारा उडाला आहे. बेरीस्ते सह चार पाड्यांना नळ पाणीपुरवठा योजनेचे पाणी पोहोचण्यापूर्वीच टाकीला गळती लागल्याने या योजनेच्या कामाच्या दर्जावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. पाड्यापर्यंतची नळजोडणी बाकी असतानाच या टाकीला गळती लागली लागल्याने येथील ग्रामस्थ आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.

तालुक्यातील पाणीटंचाई कमी व्हावी यासाठी बेरीस्ते या ग्रामपंचायतीसाठी सीएसआर फंडातून नळपाणीपुरवठा योजना मंजुर करण्यात आली. पावसाळा वगळता वर्षभरात म्हणजे डिसेंबर 2017 पर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, तरीही हे काम मुदतीत पूर्ण न झाल्याने तेथे पाणीबाणीला सुरुवात झाली आहे. यामुळे योजना मंजूर, निधी उपलब्ध, तरीही केवळ कामाच्या संथगतीमुळे या गावातील महिलांच्या डोक्यावरचा हंडा काही उतरला नाही. याबाबत पुढारीन वेळोवेळी आवजा उठवल्यानंतर नदीकाठावरील विहीर ते पाणीसाठवण टाकीपर्यंत कसेबसे हे काम पूर्ण होऊन पाणीही पोहोचले. मात्र, या टाकीलाच आता गळती लागल्याने दररोज शेकडो लिटर पाणी वाहुन जात आहे. महत्त्वाचे म्हणजे या टाकीपासून अजून तेलीउंबरपाडा, रामडोह वाडी, पाटीलपाडा, उंबरपाडा या पाड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी पाईपलाईन टाकण्याचे काम बाकी असतानाच टाकीला गळती लागली आहे. त्यामुळे यंदाही गावाची पाणीटंचाई कायम राहणार आहे.

हे काम गेल्या वर्षीच पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही. आता केवळ टाकीपर्यंत पाणी आले आहे. परंतु, टाकीला गळती लागल्याने पंचायत समितीला घेराव घालू. - प्रमोद जाधव, ग्रामस्थ, बेरीस्ते मुळगावठाण

या पाण्याच्या टाकीला प्लास्टर करण्याचे काम शुक्रवार (आजपासून) सुरू होणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाने कळवले आहे. - प्रमोद गोडांबे, गटविकास अधिकारी, मोखाडा

Tags : Water Supply Project, Mokhada