होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कुणी टँकर देता का टँकर? तहानलेल्या नागरिकांचा सवाल

कुणी टँकर देता का टँकर? तहानलेल्या नागरिकांचा सवाल

Published On: Apr 18 2018 9:56AM | Last Updated: Apr 18 2018 9:54AMमोखाडा : हनिफ शेख

मोखाडा तालुक्यातील पाणी टंचाईग्रस्त गावपाड्यांनी पन्नाशी गाठली असताना मागणी करूनही अद्याप कुडवा आणि पळसपाडा या दोन गावांना केवळ शासकीय नियमांमुळे पाणी देण्यात आले नाही. त्यामुळे कुणी टँकर देते का टँकर असे म्हणण्याची पाळी उभय गावांतील तहानलेल्या नागरिकांवर आली आहे.

दरवर्षी पाणीटंचाईला सुरवात झाली की, अगदी एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात पोशेरा ग्रामपंचायती मधील पळसपाडा या पाड्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. अगदी धरणाच्या उशाला वसलेल्या या गावांना शासन कोणतिही नळपाणी योजना देत नसल्याने त्यांना टँकरचाच आधार घ्यावा लागतो. मात्र, गेल्या 20 ते 25 वर्षांपासून दरवर्षी टँकर देणारे प्रशासन यंदा, मात्र शासकीय आदेशाचा आधार घेत ज्या गावाजवळ दीड कि.मी.च्या आसपास पाण्याचा साठा आहे त्यांना टँकर देता येणार नाही असे कारण पुढे करून टँकर पुरवत नाही. मात्र, धरणातून पाणी हंड्याने आणणे कसे शक्य आहे, असा सवाल येथील महिलांनी केला आहे. येथील नागरिकांनी 31 मार्चला पाणीपुरवठा करण्याची मागणी केली होती. मात्र, अद्यापि टँकरची व्यवस्था होऊ शकली नाही.

आसे ग्रामपंचायती मधील कुडुवा येथे प्रगती प्रतिष्ठानकडून पाणीपुरवठ्या संदर्भात नळपाणी योजना कार्यान्वित आहे. मात्र, गेल्या आठवडाभरापासून हा पाणीपुरवठाही बंद झाल्याने तेथील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या नागरिकांनीही टँकरची मागणी केली आहे. मात्र, पाणीपुरवठा विभागाच्या कागदावर येथिल नळपाणी योजना दिसत असल्याने येथेही शासकीय कागदात लोकांची तहान गुंडाळली गेल्याचे चित्र दिसत आहे.

पळसपाडा येथील संबंधित जवळच्या धरणावर गेल्या वर्षी पाणीटंचाईच्या काळात पाणी भरण्यासाठी गेलेल्या महिलेचा बुडून मृत्यू झाला होता. मात्र, तरीही प्रशासन या पळसपाड्याला टँकरने पाणी पुरवण्याबाबत उदासीन असल्याने संताप व्यक्त होत आहे.

नियमानुसार दीड कि.मी. च्या आता पाणीसाठा असणार्‍या गावात टँकर देता येत नाही. मात्र, पाणीपुरवठा विभागाकडून तात्काळ पाहणी करून ग्रामस्थांच्या मागणी नुसार पुढील कार्यवाही करता येईल. - प्रमोद गोडांबे, गटविकास अधिकारी मोखाडा

आमच्या गावाची लोकसंख्या 250 एवढी असून आम्हाला गेल्या आठवड्यापासून पाणीटंचाई भासत आहे. त्यामुळे एकतर आमची पाणीपुरवठा योजना सुरू करावी किंवा आम्हाला टँकर पुरवावे. - गंगाराम कामडी, कुडुवा ग्रामस्थ 

Tags : Water Shortage, Mokhada