Tue, Jan 21, 2020 10:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई-पुणे एक्स्प्रेस जवळ वॉटर हार्वेस्टिंगचा प्रस्ताव; प्रस्तावाची तात्काळ दखल

मुंबई-पुणे एक्स्प्रेस जवळ वॉटर हार्वेस्टिंगचा प्रस्ताव; प्रस्तावाची तात्काळ दखल

Published On: Jul 19 2019 2:58PM | Last Updated: Jul 19 2019 2:38PM
नवी मुंबई : प्रतिनिधी

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गालगत घाट परिसरात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे रेन वॉटर हार्वेस्टिंग करून संचय करावे, असा महत्त्वपूर्ण प्रस्ताव कळंबोली भाजपाकडून मुख्यमंत्री कार्यालयाला देण्यात आला. ऑनलाईन पद्धतीने केलेल्या या सूचनेचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी स्वागत केले. त्यांनी याबाबत अंमलबजावणी करण्याकरिता हा प्रस्ताव नगर विकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर यांच्याकडे त्वरित वर्ग केला. त्यानंतर रस्ते विकास महामंडळाच्या वरिष्ठ पातळीवरून याबाबत हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. भाजपाचे कळंबोली शहर उपाध्यक्ष प्रशांत रणवरे यांच्या या संकल्पनेची शासकीय पातळीवर तत्काळ दखल घेण्यात आली.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग हा ९१ किलोमीटरचा आहे. यामुळे दोन्ही महानगर जवळ आले आहेत. हा महामार्ग बोर घाटातून जातो. या मार्गावर अनेक डोंगरातून बोगदे करून वाट करून देण्यात आली आहे. पावसाळ्यात द्रुतगती महामार्गाच्या बाजूला काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. विशेषता खोपोली खंडाळा, लोणावळा आणि काही प्रमाणात मावळ भागात पावसाचे प्रमाण जास्त असते. डोंगर माथ्यावरून हे पाणी वाहत येऊन वाया जाते. महामार्गावर पावसाचे पाणी आल्याने लेनची ही काही प्रमाणात दुरावस्था होते. एकंदरीतच पावसाचे प्रमाण जास्त असतानाही त्याचा काहीच फायदा होत नाही. रस्ते विकास महामंडळाने आयआरबीच्या माध्यमातून दुभाजकांवर वेगळ्या प्रकारची झाडे लावली आहेत. त्या झाडांना पावसाळ्याव्यतिरिक्त इतरवेळी टँकरने पाणी घालावे लागते. याकरीता मोठ्या प्रमाणात खर्च येतो आणि वेळही वाया जातो. इतर ठिकाणाहून पाणी आणून ही झाडे जगवावी लागतात. या पार्श्वभूमीवर कळंबोली भाजपाकडून महामार्गालगत पडणाऱ्या पावसाचं रेन वॉटर हार्वेस्टिंग करून ते पाणी साठवण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला.

प्रशांत रणवरे यांच्यासह पक्षाचे कळंबोली शहराध्यक्ष रविनाथ पाटील यांनी आपली ही संकल्पना सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासमोर मांडली. त्यांच्या मार्गदर्शनानुसार रणवरे यांनी द्रुतगती महामार्ग लगत रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्याबाबतची सूचना देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडे केल्या. त्यानुसार प्रधान सचिव अजोय मेहता यांनी एका तासाच्या आतमध्ये या सूचनेचे स्वागत करून आपण ती नगर विकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर यांच्याकडे पाठवले असल्याचा अभिप्राय प्रशांत रणवरे यांना कळवला. 

तर, यासंदर्भात रस्ते विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवले. कळंबोलीच्या भाजप पदाधिकाऱ्यांशी फोन द्वारे संपर्क साधून ही सुचना चांगली असल्याचे सांगत भविष्यात हा विभाग याविषयी सकारात्मक निर्णय घेईल अशी ग्वाही त्यांच्याकडून देण्यात आली. तसेच रणवरे यांची संकल्पना रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी समजावून घेतली.    

या आहेत सूचना              

पनवेल , लोणावळा , खालापूर , तळेगाव या परिसरात जास्तीत जास्त पाऊस होतो. त्यानुसार खालील उपाय योजना केल्यास फायदा होऊ शकतो.
१) पाण्याचा  रेन वॉटर हार्वेस्टिंग करून  जमिनीची पाण्याची पातळी वाढू शकते .
२) मुंबई - पुणे द्रुतगती मार्गाला झाडांसाठी लागणारे टँकर - हे पावसाळ्यानंतर किमान ४ महिने तरी संचय केलेले पाणी आपण वापरू शकतो ९१ किलोमीटर रेंजचे टँकर जर ४ महिने वापर केला नाही तर शासनाच्या महसुलात वाढ होऊ शकते .
३) आजूबाजूच्या गावांना देखील तरतुदीनुसार नियम व अटी टाकून पाणी देऊ शकतो.
४) प्रत्येक १० किलोमीटर ला पाणीची मोठी जमिनीत टाकी बांधल्यास ते पाणी द्रुतगती मार्गाला झाडांसाठी वापरले जाऊ शकते.