Sun, Nov 18, 2018 12:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सोसायटी-सेक्रेटरीच्या हल्ल्यात वॉचमनचा मृत्यू

सोसायटी-सेक्रेटरीच्या हल्ल्यात वॉचमनचा मृत्यू

Published On: Jun 20 2018 2:01AM | Last Updated: Jun 20 2018 1:23AMउल्हासनगर : वार्ताहर

इमारतीमधील वॉचमनने सोसायटीची कामे न केल्याने व बिल्डिंगची लाईट न लावल्याने सेक्रेटरीने वॉचमनचा गळा जोराने आवळून त्याला धक्का दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी मध्यरात्री उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. विकास बलबहाद्दूर सुनार असे या मृत वॉचमनचे नाव आहे. याप्रकरणी सेक्रेटरी विकी तलरेजा (36) याच्याविरोधात उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शहरातील कॅम्प नं. 2 येथील खेमाणी मच्छीमार्केट परिसरात मेनका पॅलेस ही इमारत आहे. 7 महिन्यांपूर्वी या इमारतीमध्ये विकास हा गुरखा वॉचमन म्हणून कामाला लागला होता. याच इमारतीमधील वॉचमन रुममध्ये तो पत्नी अनिता व 3 वर्षीय मुलीसोबत राहत होता. विकास हा इमारतीत राहणार्‍या  सर्व नागरिकांची कामे करीत असे. मात्र, सोमवारी तो काम न करता झोपून राहिला होता. शिवाय त्याने सायंकाळी बिल्डींगची लाईट न लावल्याने सेक्रेटरी विकी तलरेजा यांनी वॉचमन विकास याला कामावरून चांगलेच झापले. 

तू व्यवस्थित काम करीत नाहीस, याठिकाणी काम करू नकोस, येथून चालता हो, अशी तंबी विकीने वॉचमनला दिली. त्यावर विकास याने पावसाळ्यानंतर मी कुटुंबासह निघून जाईन, असे विकी याला सांगताच त्या दोघांमध्ये बोलाचाली झाली. त्यावेळी संतापलेल्या विकीने वॉचमन विकास याचा गळा जोराने दाबून त्याला धक्का दिल्याने तो खाली पडला. 

बेशुद्ध अवस्थेत विकास याला उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या घटनेप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात मृत विकास सुनार याची पत्नी अनिता सुनार हिने दिलेल्या फिर्यादीवरून इमारतीचे सेक्रेटरी विकी तलरेजा याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय पालवे करीत आहेत.