Fri, Apr 26, 2019 09:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › उद्योगांना सांडपाणी प्रक्रिया करून वापरणे बंधनकारक

उद्योगांना सांडपाणी प्रक्रिया करून वापरणे बंधनकारक

Published On: Dec 04 2017 1:58AM | Last Updated: Dec 04 2017 12:58AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

वाढत्या शहरीकरणाबरोबरच निसर्गातील सततच्या बदलामुळे पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. सिंचन व पिण्यासाठी लागणार्‍या पाण्याबरोबरच औद्योगिक कारणांसाठी लागण्या पाण्याचे नियोजन कसे करायचे असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. हे लक्षात घेता एमआयडीसी क्षेत्रातील उद्योग, औष्णिक विद्युत प्रकल्पांना शहरातील प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वापर बंधनकारक करावा, असे आदेश नगरविकास विभागाने दिले आहेत.

केंद्रशासनाच्या उर्जा विभागाच्या धोरणानुसार औष्णिक विद्युत केंद्र्राना लागणारे पाणी सभोवतालच्या 50 कि.मी परिघातील मलनिस्सारण प्रकल्पातील प्रक्रिया केलेले सांडपाणी वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याप्रमाणे राज्यातील उर्जा प्रकल्पांना 100 कि.मी परिघातील प्रक्रियायुक्त पाण्याचा वापर बंधनकारक करण्यात यावा. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या क्षेत्रातळ उद्योगांना सभोवतालच्या 50 कि.मी क्षेत्रातील प्रक्रियायुक्त सांडपांण्याचा वापर बंधनकारक करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. 

राज्यातील नागरी भागात तयार होणार्‍या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासोबतच पुनर्चकीकरण व पुनर्वापर करणे हे संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यानुसार शहरातील सांडपाण्याचे व्यवस्थापन करून त्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्याचे नियोजन संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी करावे. नवी मुंबई महानगरपालिकेने ज्या प्रमाणे एमआयडीसीच्या परिक्षेत्रातील उद्योगांना तृतीयस्तरीय प्रक्रिया केलेले पाणी उपलब्ध करून देण्याचा आणि त्यामुळे बचत होणारे पाणी कल्याण डोंबिवली पालिकेला देण्याचा प्रकल्प राबविला जात आहे. त्या प्रमाणे इतर शहरांतदेखील या धोरणानुसार पथदर्शी प्रकल्प राबविण्यात यावा, असे आदेश नगर विकास विभागाने दिले आहेत.