Tue, Jul 16, 2019 22:02होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आमदाराच्या कारला धडक देऊन चालकाला शिवीगाळ

आमदाराच्या कारला धडक देऊन चालकाला शिवीगाळ

Published On: Sep 08 2018 1:32AM | Last Updated: Sep 08 2018 12:58AMमुंबई : प्रतिनिधी

एआयएमआयएम पार्टीचे आमदार वारिस पठाण यांच्या कारला ओव्हरटेक करण्याचा नादात धडक देऊन त्यांच्या कारचालकाला शिवीगाळ केल्याप्रकरणी दोन तरुणांना गुरुवारी रात्री वांद्रे पोलिसांनी अटक केली. अपघातात या दोघांनाही किरकोळ दुखापत झाल्याने त्यांच्यावर भाभा हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. अटकेनंतर या दोघांची वांद्रे येथील लोकल कोर्टाने जामिनावर सुटका केली आहे. अभिजीत यादवा सुवर्णा आणि वैभव विजय नारकर अशी या दोघांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

वारिस पठाण हे आमदार असून गुरुवारी रात्री पावणेअकरा वाजता ते त्यांचा कारचालक मोहम्मद अजमत मोहम्मद हनीफ शेख याच्यासोबत वांद्रे सागरी सेतूवरुन एस. व्ही रोडच्या दिशेने जात होते. यावेळी एका बाईकवरुन भरवेगात जाणार्‍या दोन तरुणांनी त्यांच्या कारला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात त्यांनी कारला धडक दिली. त्यात ते दोघेही खाली पडल्याने त्यांना किरकोळ दुखापत झाली होती. यावेळी या दोघांनीही कारचालक मोहम्मद अजमत शेख यांना शिवीगाळ करुन अपघाताला तोच कारणीभूत असल्याचा आरोप केला आणि त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. 
चौकशीत अभिजीत सुवर्णा हा गोरेगाव येथील संजयनगर तर वैभव नारकर हा जोगेश्‍वरी लिलोधर यादव चाळीत राहतो. ते दोघेही रात्री त्यांच्या बाईकवरुन सागरी सेतूवर आले होते. यावेळी हा अपघात झाला होता. अटकेनंतर या दोघांनाही शुक्रवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.