Thu, Jul 18, 2019 02:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत आता भटक्या मांजरांची नसबंदी!

मुंबईत आता भटक्या मांजरांची नसबंदी!

Published On: Aug 02 2018 1:59AM | Last Updated: Aug 02 2018 1:10AMमुंबई : प्रतिनिधी 

मुंबईत आता मांजरांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून, भटक्या कुत्र्यांप्रमाणे भटक्या मांजरांचीही नसबंदी करण्यासाठी महापालिकेच्या देवनार पशुवधगृह खात्याने अ‍ॅनिमल वेल्फर्स बोर्ड ऑफ इंडियाशी पत्रव्यवहार केला आहे. 

पालिका अधिनियमात भटक्या कुत्र्यांसंदर्भात नियंत्रण व अन्य तरतुदीचा स्पष्ट उल्लेख आहे.भटक्या मांजरांबद्दल  मात्र कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षात चाळी, झोपडपट्टी व अन्य ठिकाणी रस्त्यावर फिरणार्‍या मांजरांची संख्या वाढत आहे. परिणामी, भटक्या कुत्र्यांप्रमाणे मांजरांचीही नसबंदी करणे आवश्यक झाले आहे. याकडे शिवसेनेचे नगरसेवक अनिल पाटणकर यांनी पालिकेचे लक्ष वेधले होते. मांजरांचा होणार उपद्रव थांबवण्यासाठी त्यांची नसबंदी करून, त्यांना रेबीज प्रतिबंधक लसही देण्यात यावी, असा ठराव फेब्रुवारी 2018 मध्ये पालिका सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आला.

या ठरावावर अभिप्राय देताना,देवनार पशुवधगृह खात्याने  मुंबईत भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीचे कार्य प्राणी क्‍लेश प्रतिबंधक कायदा 1960 प्राणी जनन नियंत्रण नियमावली 2001 नुसार पार पाडण्यात येते. भटक्या मांजरांची नसबंदी करायची असल्यास त्यासंदर्भात मार्गदर्शक तत्वे व नियमावली तयार करणे आवश्यक असल्याचेही सांगितले. पालिकेने अ‍ॅनिमल वेल्फर्स बोर्ड ऑफ इंडिया यांच्याशी पत्रव्यवहार करून भटक्या कुत्र्यांप्रमाणे भटक्या मांजरांना समाविष्ट करण्याबाबत व मार्गदर्शक तत्वे कळवण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे. ही नियमावली अस्तित्वात आल्यानंतर मुंबई महापालिका मांजरांच्या नसबंदीबाबत सकारात्मक पावले उचलणार असल्याचे देवनार पशुवध गृह विभागाकडून सांगण्यात आले.