Wed, Apr 24, 2019 11:53होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नवी मुंबई मेट्रोची प्रतीक्षा लांबली

नवी मुंबई मेट्रोची प्रतीक्षा लांबली

Published On: Jan 16 2018 2:13AM | Last Updated: Jan 16 2018 12:54AM

बुकमार्क करा
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

प्रदीर्घ काळ लांबलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला गती मिळत असली तरी नवी मुंबई मेट्रोसाठीची प्रतीक्षा लांबणार आहे. बेलापूर ते पेंढार दरम्यान 11 पैकी 6 स्थानके बांधणार्‍या ठेकेदाराचे कंत्राट कामाच्या धिम्या गतीमुळे सिडकोने रद्द केले आहे. या कंत्राटाची किंमत 321 कोटी रुपये असून, ते मेसर्स संजोस-महावीर-सुप्रीम या कंपनीला देण्यात आले होते. प्रकल्प 2014 साली पूर्ण होणार होता, मात्र तो पूर्णत्वास जाण्यासाठी डिसेंबर 2018 मध्ये पूर्ण होण्याची चिन्हे आहेत.

सहा स्थानकांवरील 62 टक्के काम पूर्ण झाले आहे. आता ते मेसर्स प्रकाश कन्स्ट्रोवेलकडून पूर्ण केले जाणार आहे. उर्वरित पाच स्थानकांच्या बांधकामासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती सिडको अधिकार्‍यांनी दिली. बेलापूर पेंढारदरम्यान पहिली मेट्रो डिसेंबर 2018 पर्यंत सुरू करण्याचे आमचे लक्ष्य आहे, जनतेसाठी हा प्रकल्प मे 2019 पर्यंत सुरू होणार असल्याचे या अधिकार्‍याने सांगितले. 

21.45 किमी लांबीच्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्पात 4 मार्गिका आहेत. 2011 साली या प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले. मे 2019 मध्ये सुरू होणारी पहिली मार्गिका बेलापूर ते पेंढार ही असून ती 11.10 किमी लांबीची आहे. तिच्यासाठी 3063 कोटी रुपये खर्च आला आहे.  या मार्गावर 96 टक्के व्हायाडक्ट बांधकाम पूर्ण करण्यात आले असून,  त्यासाठी 305 कोटी रुपये खर्च झाले आहेत. रेल्वे क्रॉसिंगसाठी 70 कोटी रुपयांचे काम सुरू आहे.132 कोटी रुपये खर्च करून मेट्रो आगारांचे 93 टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे. ट्रेनचे डबे लवकरच दाखल होण्याची शक्यता आहे.