Sat, Apr 20, 2019 10:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 27 हजार शिक्षकांचा पगार वेटिंगवर

27 हजार शिक्षकांचा पगार वेटिंगवर

Published On: Mar 12 2018 1:35AM | Last Updated: Mar 12 2018 1:30AMमुंबई : प्रतिनिधी

शाळांनी वेतन देयके वेळेवर सादर करूनही मुंबईतील 27 हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे वेतन अद्यापही न करणार्‍या संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी शिक्षक परिषदेने केली आहे. शिक्षकांचे वेतन 1 तारखेला करण्यात यावे यासाठी राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच जिल्हा परिषद व महानगरपालिका शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे वेतन व भत्ते शालार्थ या प्रणालीद्वारे अदा करण्याकरिता 7 नोव्हेंबर 2012 च्या शासन निर्णयाद्वारे धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे

मागील तीन महिन्यापासून शालार्थ प्रणालीत बिघाड झाल्याने फेब्रुवारीचे वेतन ऑफलाईन काढण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने 23 फेब्रुवारी रोजी काढला व 26 फेब्रुवारी पर्यंत वेतन देयके वेतन व भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे पाठविण्याच्या सूचना शाळांकडे करण्यात आल्या. त्यानुसार शाळांनी मुंबईतील उत्तर, पश्चिम व दक्षिण शिक्षण निरीक्षक कार्यालयातील वेतन अधिक्षक कार्यालयात वेतन देयके जमा केली. ऑफलाईन वेतन काढण्याच्या शासन निर्णयाला 15 दिवस उलटून गेल्यावरही अद्यापही शिक्षण विभागाकडून वेतनाबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

 गेले 12 दिवस मुंबईमधील तिन्ही शिक्षण निरीक्षक कार्यालयातील अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांतील शिक्षकांचे वेतन होऊ शकलेले नाही. अंशतः अनुदानित शिक्षकांची अवस्था बिकट असून त्यांची एप्रिल2017 पासूनची बिले जमा आहेत. मंत्रालयात फेर्‍या मारूनही अधिकारी अधिवेशनात व्यग्र असल्याने याबाबतचा कोणताही आदेश निघत नाही. याबाबत तत्काळ आदेश न झाल्यास शिक्षकांना मंत्रालयात प्रथम गांधीगिरी आंदोलन करावे लागेल, अन्यथा शिक्षक कधीही आक्रमक होतील, असा इशाराही देण्यात आला आहे.