होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘वाडेकरांच्या जाण्याने क्रिकेटचे भरून न येणारे नुकसान’

‘वाडेकरांच्या जाण्याने क्रिकेटचे भरून न येणारे नुकसान’ 

Published On: Aug 17 2018 2:15PM | Last Updated: Aug 17 2018 2:15PMमुंबई : क्रीडा प्रतिनिधी

माजी कर्णधार अजित वाडेकर यांच्या जाण्याने क्रिकेटची न भरून येणारे नुकसान  झाले असल्याची भावना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने व्यक्त केली. वयाच्या 77 व्या वर्षी वाडेकर यांचे निधन झाले.सचिन त्यांच्या अंत्यदर्शनासाठी स्पोर्ट्स फिल्ड येथे त्यांच्या राहत्या निवास्थानी पोहोचला असता त्याने वाडेकरांच्या आठवणीना उजाळा दिला.

क्रिकेटचे खूप मोठे नुकसान आहे. त्यांच्या जाण्याने माझ्या आयुष्यात देखील मोठी हानी झाल्याचे मला वाटते. वाडेकर हे ग्रेट क्रिकेटर असल्याची जाणीव सर्वांनाच होती. क्रिकेटपटू सोबत त्यांचे व्यक्तीमत्व देखील तितकेच महान होते. अनेक वर्षे आमचे सलोख्याचे संबंध राहिले असे सचिन म्हणाला. सकाळच्या सुमारास अंत्यदर्शनासाठी वाडेकरांचे पार्थिव त्यांच्या वरळी येथील राहत्या घरी ठेवण्यात आले होते. त्यांनतर त्यांचा अंत्यविधी शिवाजी पार्क स्मशानभूमीत पार पडला.

वाडेकर यांचे माझ्या आयुष्यातील योगदान महत्वाचे आहे. मी तेव्हा 20 वर्षाचा युवा खेळाडू होतो. त्यावेळी मला अनुभवी व्यक्तीच्या मार्गदर्शनाची गरज होती. त्यांना खेळाडूमधून सर्वोत्तम कामगिरी कशी करून घेता येईल याची जाण होती. त्यांच्यामुळे मला खूप फायदा झाला.त्यांनी कर्णधार, प्रशिक्षक आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मित्र अशा भूमिका त्यांनी पार पाडल्या. मी त्यांच्यासोबत अनेक तास चर्चा करायचो. आम्ही जेव्हा क्रिकेटवर बोलायचो तेव्हा आम्ही गंभीर असायचो पण, जेवायला एकत्र यायचो तेव्हा त्यांचे वागणे वेगळे असायचे. ते सर्वांचे लाडके होते असे सचिनने सांगितले.

माझ्या वयातील सर्वजण त्यांना आपले प्रेरणास्थान मानायचे. ते चांगले डावखुरे फलंदाज होते. त्यांच्या जाण्याने क्रिकेट जगताचे मोठे नुकसान झाल्याची भावना माजी यष्टिरक्षक सबा करीम यांनी भावना व्यक्त केली. यावेळी माजी क्रिकेटपटू समीर दिघे, विनोद कांबळी, माजी हॉकी कर्णधार एम एम सोमय्या, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी व सध्याचे पदाधिकारी अंत्यदर्शनास उपस्थित होते.