Fri, Jul 19, 2019 21:59होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भंडारा-गोंदियात ४९ केंद्रांवर आज फेरमतदान

भंडारा-गोंदियात ४९ केंद्रांवर आज फेरमतदान

Published On: May 30 2018 2:14AM | Last Updated: May 30 2018 1:56AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत व्होटिंग मशिन बंद पडल्याने मतदान प्रक्रियेच्या उडालेल्या बोजवार्‍यानंतर गोंदियाचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. 49 मतदान केंद्रांवर फेरमतदान घेण्याचा निर्णयही केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला असून, नव्या जिल्हाधिकार्‍यांच्या देखरेखीत मतदान प्रक्रिया बुधवारी पार पडणार आहे. 

 मतदान यंत्रांच्या गोंधळाबद्दल तक्रारी आल्यानंतर निवडणूक आयोगाच्या राज्यातील मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला सविस्तर अहवाल पाठविला होता. या अहवालानंतर 49 मतदान केंद्रांवर फेरमतदान घेण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले. तसेच आयोगाने जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांची तत्काळ उचलबांगडी करण्याच्या सूचना राज्य सरकारला दिल्या.  

काळे यांच्या जागी नागपूर जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकारी कादंबरी भगत-बलकवडे यांची जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हाधिकारी म्हणून नियुक्‍ती करण्यात आली असून, त्यांच्या देखरेखीत हे फेरमतदान पार पडणार आहे. विविध राजकीय पक्षांकडून व्होटिंग मशिनबाबत संशय घेतला जात असताना एकूण व्होटिंग मशिनपैकी दहा टक्क्यांपेक्षा जास्त मशिन बंद पडल्याने निवडणूक आयोगालाही टीका सहन करावी लागली. तसेच फेरमतदानाची नामुष्की ओढावली. त्यामुळे काळे यांना जिल्हाधिकारी पदावरून दूर करण्यात आले. बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.