Sun, Jul 21, 2019 09:50होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विधानपरिषद निवडणुकांसाठी भरघोस मतदान 

विधानपरिषद निवडणुकांसाठी भरघोस मतदान 

Published On: Jun 26 2018 1:21AM | Last Updated: Jun 26 2018 1:17AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

मुंबईसह कोकणात दिवसभर पावसाने हजेरी लावली असली तरी विधानपरिषदेच्या चुरशीच्या बनलेल्या निवडणुकीत मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान केले. सर्वात चुरस असलेल्या कोकण पदवीधर मतदारसंघात 73.89 टक्के मतदान झाले असून तिरंगी लढतीमुळे निकालाची उत्सुकता वाढली आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघात विक्रमी 92.30 टक्के मतदान झाले असले तरी मुंबईत निम्म्या पदवीधरांनी मतदानाकडे पाठ फिरविल्याने 53.23 टक्केच मतदान झाले. येथे शिक्षकांनी मोठ्या उत्साहात मतदान केल्याने 83.26 टक्के मतदान झाले. या निवडणुकीची मतमोजणी 28 जून रोजी होणार आहे. 

मुंबई पदवीधर मतदार संघात शिवसेनेचे विलास पोतनीस, भाजपाचे अ‍ॅड.अमित मेहता आणि काँग्रेस ˆ राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप आघाडीचे अ‍ॅड. राजेंद्र कोरडे, अपक्ष उमेदवार दिपक पवार आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आणि मनसे पुरस्कृत उमेदवार राजू बंडगर यांच्यासह 12 उमेदवार रिंगणात होते. या मतदार संघात एकूण 74 हजार मतदार होते. मात्र, पदवीधरांनी अपेक्षेप्रमाणे मतदान केले नाही. जवळपास निम्म्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला नाही. या निवडणुकीत शिवसेनेची बाज भक्कम मानली जात आहे. मात्र, भाजपनेही या निवडणुकीत ताकद झोकून दिल्याने निकालाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. 

मुंबई शिक्षक मतदार संघात लोकभारतीचे विद्यमान आमदार कपिल पाटील, भाजपा पुरस्कृत अनिल देशमुख आणि शिवसेनेचे शिवाजी शेंडगे यांच्यासह एकूण 10 उमेदवार रिंगणात होते. या मतदारसंघात 10 हजार 170 शिक्षक मतदार असल्याने ही मते आपल्याकडे वळविण्यासाठी तीनही उमेदवारांनी जोर लावला. त्यामुळे 83 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले. या निवडणुकीत आमदार कपिल पाटील हॅट्ट्रीक साधतात का, ते गुरुवारी स्पष्ट होणार आहे. 

कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना शिवसेनेचे माजी महापौर संजय मोरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी जोरदार लढत दिली. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीची सूत्रेे हाती घेत प्रचार यंत्रणा राबविली. तर नजीब मुल्ला यांच्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री गणेश नाईक आदींनी मोर्चेबांधणी केली होती. त्याचा परिणाम म्हणून या मतदारसंघात सुमारे 74 टक्के मतदान झाले. या चुरशीच्या लढतीचे चित्र अनिश्‍चित बनले आहे. 

नाशिक शिक्षक मतदारसंघात भाजपाचे अनिकेत पाटील, शिवसेना पुरस्कृत किशोर दराडे, काँग्रेस ˆ राष्ट्रवादी आघाडी पुरस्कृत उमेदवार संदिप बेडसे यांच्यासह 16 उमेदवार रिंगणात होते. प्रथमच 92 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाल्याने हे मतदान कोणाच्या पथ्यावर पडते ते मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.