Fri, Dec 13, 2019 18:00होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे : स्वाभिमानी संघटनेकडून शिक्षण विभागाला फिनाईल आणि पाण्याच्या बाटल्या भेट 

ठाणे : स्वाभिमानी संघटनेकडून शिक्षण विभागाला फिनाईल आणि पाण्याच्या बाटल्या भेट 

Published On: Jun 25 2019 2:29PM | Last Updated: Jun 25 2019 2:13PM
ठाणे : प्रतिनिधी 

ठाणे महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांसाठी पालिका शाळांच्या शौचालयांमध्ये १ कोटी ४० लाखांच्या हॅन्डवॉश खरेदी प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे . मात्र या प्रस्तावाच्या विरोधात स्वाभिमानी संघटनेच्या वतीने आज, मंगळवार (दि.२५) आंदोलन करण्यात आले. 

पालिका शाळांच्या अनेक शौचालयांमध्ये पाणीच उपलब्ध नसून याशिवाय या शौचालयांमध्ये मूलभूत सुविधा देखील उपलब्ध नसल्याने १ कोटी ४० लाख खर्च करून हॅन्डवॉश खरेदी करण्याची आवश्यकताच काय? असा प्रश्न उपस्थित करत संघटनेच्या वतीने हा प्रस्ताव रद्द करण्यासाठी नौपाडा येथील शिक्षण मंडळाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. तर यावेळी संघटनेकडून शिक्षण विभागाला शौचालयांच्या स्वच्छतेसाठी फिनाईलच्या आणि पाण्याच्या बाटल्या तसेच काडी कोयंडे भेट देण्यात आले. याचबरोबर पालिकेने हा प्रस्ताव जर का रद्द केला नाही तर न्यायालयात जाण्याचा इशारा संघटनेच्या वतीने यावेळी देण्यात आला. 

ठाणे महापालिकांच्या शाळांमध्ये गरीब विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांच्या स्वच्छतेकडे आणि त्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्यासाठी पालिकेच्या शाळांमध्ये हॅन्ड वॉश बसवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. मात्र हा प्रस्तावच आता वादाच्या भोवऱ्यात सापडला असून स्वाभिमानी संघटेनेचे ठाणे शहर अध्यक्ष विजय त्रिपाठी यांच्या नेतृत्वाखाली नौपाडा येथील शिक्षण विभागाच्या कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करण्यात आले. काही पालिका शाळांचीच परिस्थिती गंभीर नसून शौचालयांची देखील मोठ्या प्रमाणात दुरावस्था आहे. विशेष म्हणजे अनेक शौचालयांमध्ये पाणी उपलब्ध नाही. दरवाज्यांच्या कड्या तुटलेल्या अवस्थेत आहेत, शौचालयांची स्वच्छता देखील होत नसून जर या मूलभूत सुविधाच मुलांना मिळत नसतील हा तर १ कोटी रुपये खर्च करून हॅन्डवॉश खरेदी करण्याची आवश्यकताच काय असा प्रश्न शहर अध्यक्ष विजय त्रिपाठी यांनी उपस्थित केला आहे . 

तर, ठाणे महापालिकेच्या शाळांना मूलभूत सुविधा देण्यात याव्यात, शाळांमध्ये पाणी उपलब्ध करून देण्यात यावे, शाळांच्या इमारती दुरुस्त करण्यात याव्यात, अशा विविध मागण्यांचे निवेदन यावेळी शिक्षण अधिकारी शेषराव बडे यांना देण्यात आले. ठाणे महापालिकेच्या गैरकारभाराच्या विरोधात आमदार नितेश राणे यांची देखील भेट घेणार असून शिक्षण मंत्र्याच्या माध्यमातून एखादी समिती गठीत करून उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी देखील करण्यात असल्याचे त्रिपाठी यांनी यावेळी स्पष्ट केले. यासंदर्भात शिक्षण अधिकारी शेषराव बडे यांच्याशी संपर्क साधला असताना या संपूर्ण प्रस्तावाची माहिती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.