Tue, Nov 19, 2019 10:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विष्णु सावरा यांचा राजीनामा, नवा पालकमंत्री कोण? 

विष्णु सावरा यांचा राजीनामा, नवा पालकमंत्री कोण? 

Published On: Jun 16 2019 2:57PM | Last Updated: Jun 16 2019 2:22PM
मोखाडा : प्रतिनिधी

राज्याचे आदिवासी विकास मंत्री विक्रमगड विधानसभेचे आमदार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णु सावरा यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता जिल्ह्याचा नवा पालकमंत्री कोण हा प्रश्न समोर आला आहे. मुळात आजवर मंत्री म्हणून सावरानी काही महत्वपूर्ण निर्णयही घेतले. तर  बाकी विषयांवरुन त्यांना टीकेलाही सामोरे जावे लागले. सावरांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासुन अस्वस्थ असल्याने त्यांनी हा राजीमाना दिल्याचे बोलले जात आहे. लोकप्रतिनिधी म्हणुन आजवर सावरांची आमदारकीची सहावी टर्म असल्याने त्यांना आदिवासी विकास मंत्री म्हणून मोठी जबाबदारी या सरकारमध्ये दिली होती.

अतिशय मितभाषी आणि सर्वांशी आदराने वागणारे सवरा पक्षाशी प्रचंड एकनिष्ठ व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जातात. आजवर विरोधक किंवा स्वकीय वा प्रशासकीय अधिकाऱ्यांशीही त्यांचे सलोख्याचे संबध आहेत. राज्याचे कॅबिनेट मंत्री झाल्यानंतरही त्यांच्या स्वभावात कसलाही अहंकार जाणवला नाही.  मात्र, गेल्या काही वर्षात कुपोषण आरोग्य आणि पाण्याच्या समस्यावरुन त्यांच्यावर अनेकदा टीका झाल्या. वस्तीगृहाच्या मुद्द्यावरून त्यांच्या निवासस्थानी विद्यार्थ्यानी मोर्चे काढले तर मधल्या काळात श्रमजीवी संघटनेने अनेक विषयांवरुन  सवरा यांना कोंडीत पकडले होते.

अशा अनेक चांगल्या वाईट घटनानी त्यांच्या मंत्रिपदाचा कार्यकाळ गाजला. या सगळ्यात काही चांगली कामे झाली. मात्र, त्यांच्याकडून त्याचे मार्केटिंग करण्यात ते अयशस्वी ठरले. निष्क्रिय मंत्री म्हणूनही विरोधक आणि काही अंतर्गत शत्रूंनी त्यांच्यावर टीका केली.

गेल्या काही वर्षापासून त्यांचे मंत्रीपद जाणार अशा चर्चाना उधाण आले होते अशातच सध्या सवरा यांची प्रकृती साथ देत नसल्याने त्यांनी राजीनामाही दिला होता यानंतर आता सवरा फक्त विक्रमगड विधानसेभेचे आमदार असणार आहेत.यामुळे आता सर्वार्थाने पालघर लक्ष ठेवून असलेले मुख्यमंत्री पक्ष वाढिसाठी जिल्ह्याचे पालकमंत्रीपद कोणाला देतात याची उत्सुकता सर्वांना लागली आहे अशा वेळी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचे नाव आघाडीवर आहे.

तर सावरा यांचे मंत्रीपद जाण्याने त्यांचे जवळचे कार्यकर्ते पदाधिकारी मात्र नाराज आहेत. कारण मंत्रिपद संभाळताना सावरा स्वतः सहा वेळा आमदार जिल्ह्याचे भूमिपुत्र येथील प्रत्येक कार्यकर्त्याला नावानिशी ओळखण्याची त्यांची खुबी आणि काहीही झाले तरी कार्यकर्ते दुखावणार याची घेत असलेली काळजी या त्यांच्या जमेच्या बाजू होत्या. आता मात्र सावरा नामदार नाही तर फक्त आमदार असणार हे नक्की.